29 March, 2024

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून पथक प्रमुखांचा आढावा

निवडणुका पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवावेत - निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली हिंगोली (जिमाका),दि.29 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आदर्श आचार संहिता मतदारसंघात लागू झाली असून, लवकरच नामनिर्देशन पत्रेही उमेदवारांकडून दाखल केली जातील. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक विषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून कामकाज करावे, अशा सूचना निवडणूक निरीक्षक (खर्च) अन्वर अली यांनी पथक प्रमुखाच्या आयोजित आढावा बैठकीत दिल्या. हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी सर्व पथक प्रमुखांचा आढावा घेतला. निवडणूक कालावधीमध्ये तक्रार असल्यास निरीक्षक अन्वर अली यांच्याशी (7666878375) व त्यांचे संपर्क अधिकारी गणेश वाघ (9923040733) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपजिल्हाधिकारी समाधान घुटुकडे, निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी गणेश वाघ, जिल्हास्तरीय खर्च समितीचे पथक प्रमुख दिगंबर माडे, माधव झुंजारे, अवैध मद्य वाटप प्रतिबंध समितीचे पथक प्रमुख तथा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, जिल्हा माध्यम व प्रमाणन सनियंत्रण समितीचे पथक प्रमुख तथा जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक पंकज बोरकर, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे अधिकारी यांच्यासह विविध कामकाज करण्यासाठी नेमण्यात आलेले पथक प्रमुख, व्हीएसटी, व्हीव्हीटी, एसएसटी, लेखांकन करणारा पथक, भरारी आदी पथकाचे वसमत, कळमनुरी, हिंगोली विधानसभा मतदार संघातील प्रमुख यांची उपस्थिती होती. राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर संनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समितीच्या पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक ठेवाव्यात. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी. अभिरुप नोंदवहीतील नोंदी अद्यावत ठेवाव्यात. तसेच एसएसटी आणि एफएसटी या पथकांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. निवडणूक कालावधीमध्ये तपासणी नाक्यांवर तपासणी करताना कोणतीही दिरंगाई करू नये, कर्तव्यावर असलेल्या पथक प्रमुख आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश अन्वर अली यांनी यावेळी सांगितले. लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी त्याच दिवशी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवाव्यात. यामध्ये अजिबात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच उमेदवारांचे निवडणुकीशी संबंधित स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या बँक खात्यातून दैनंदिन काढण्यात येणाऱ्या रकमेवर बारकाईने लक्ष ठेवावेत. तसेच सर्व पथक प्रमुखांनी समन्वयाने काम करावेत. इतर विभागाशी संबंधित माहिती मिळाल्यास ती माहिती संबंधित विभागास कळवावी. जेणेकरुन त्याच्यावर कारवाई करणे सोयीचे होईल. तसेच मतदार संघात मद्य वाटप होणार नाही यावर लक्ष ठेवावे, अशा सूचना श्री. अन्वर अली यांनी दिल्या. ******

No comments: