15 March, 2024

पीककर्ज वेळेत नूतनीकरण करून व्याज परतावा योजनेचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी श्री. पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 15 : शेतकऱ्यांनी पीक कर्जाच्या बनावट जाहिरातीस बळी न पडता आपले पीक कर्ज वेळेत नूतनीकरण करुन व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा अथवा वन टाईम सेटलमेंट (One Time Settlement) योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बँकांची त्रैमासिक डीएलसीसी बैठक पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी रिझर्व्ह बँकेचे जिल्हा व्यवस्थापक अरुण बाबू, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक एस. के. नवसारे, एसबीआयचे विभागीय व्यवस्थापक सम्राट पुरकायस्थ, जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक पंकज बोरकर व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हा‍धिकारी श्री. पापळकर म्हणाले, जिल्ह्यामध्ये पीक कर्ज नूतनीकरण फार कमी आहे. बनावट जाहिरातीस बळी पडून शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या निर्देशानुसार कुठल्याही बनावट पी कर्ज माफीच्या जाहिरातीस बळी न पडता वेळेत आपल्या पीक कर्जाचे नूतनीकरण करावे व व्याज परताव्याचा लाभ घ्यावा, असे सांगितले. एसबीआयच्या वतीने सम्राट पुरकायस्थ यांनी पीक कर्ज नूतनीकरण करण्याची आर्थिक क्षमता नसलेल्या शेतकऱ्यांनी बँकेच्या वन टाईम सेटलमेंट योजनेचा लाभ घेऊन आपले पीक कर्ज वेळेत बंद करावे, असे आवाहन केले. बँक ऑफ महाराष्ट्रचे उमेश चौधरी यांनी वन टाईम सेटलमेंट योजना सुरु आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन केले. ********

No comments: