15 March, 2024

नारी सन्मान मेळाव्यात ‘बालविवाह मुक्त हिंगोली’ लोगोचे अनावरण

हिंगोली (जिमाका), दि. 15 : येथील महिला आर्थिक विकास महामंडळ तसेच जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने आज दि. 15 मार्च रोजी शिवाजीराव देशमुख सभागृहात नारी सन्मान मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात बालविवाह मुक्त हिंगोली या लोगोचे अनावरण करण्यात आले. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव हे होते. यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी राजाभाऊ मगर, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम, ॲड. मोरे, आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक अनिल इंगोले, बालरोग तज्ञ डॉ.गोपाल कदम यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्याच बरोबर महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाने या वर्षात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरव करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. ॲड. मोरे यांनी महिलांशी संबंधित कायदे व अधिकार याबाबत माहिती दिली. जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र कदम यांनी माविमचे व महिला बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या कामाचे कौतुक केले. डॉ. गोपाल कदम यांनी महिलांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक विलास जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. सर्व मान्यवरांच्या हस्ते बालविवाहमुक्त हिंगोली या लोगोचे अनावरण करण्यात आले. या नारी सन्मान मेळाव्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बचत गट, उद्योजक महिला, सहयोगिनी यांच्या कार्याचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल चव्हाण यांनी केले. तर आभार प्रदर्शन विलास पंडित यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन आढाव, संकेत महाजन, प्रसाद मानेकर, संतोष ठाकूर, स. रफिक तसेच सर्व सीमआरसी व्यवस्थापक, लेखापाल, सल्लागार, सहयोगिनी यांनी परिश्रम घेतले. ******

No comments: