27 March, 2024

जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून नामनिर्देशन कक्षाची पाहणी

हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारत निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची घोषणा केली आहे. 15-हिंगोली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक ही दुसऱ्या टप्प्यात पार पडणार आहे. यासाठी गुरुवार दि. 28 मार्च, 2024 रोजी हिंगोली लोकसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. दि. 28 मार्चपासून ते 4 एप्रिल, 2024 पर्यंत नामनिर्देशन अर्जाची विक्री व स्वीकृती करण्यात येणार आहे. यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात नामनिर्देशन कक्ष तयार करण्यात आला आहे. या कक्षात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या निर्देशानुसार नामनिर्देशन संदर्भात कामकाज करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उमाकांत पारधी यांच्या नेतृत्त्वाखाली नामनिर्देशन कक्ष तयार करण्यात आला आहे. या नामनिर्देशन कक्षात नामनिर्देशन संदर्भात समन्वय ठेवणे, सर्व कामकाजाचे नियोजन करणे, नामनिर्देशनपत्रासोबतच शपथपत्र तपासणी, चेकलिस्ट करणे, नामनिर्देशन पत्र वितरण, फॉर्म-26 ई व नामनिर्देशन पत्राची संबंधित सहपत्रे इच्छुक उमेदवारांना वाटप करणे व त्याची नोंद घेणे, सुरक्षा अनामत रक्कम स्वीकारणे, पोच देणे, प्राप्त रक्कम शासन जमा करणे, उमेदवार व सूचक यांचे मतदार यादीत नाव शोधणे, खर्चाचे रजिस्टर, फोटो व सह्यांचे नमुने घेणे, विहित नमुन्यात त्यांची नोंद व प्रमाणपत्र घेणे यासह विविध कामासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय इमारतीमध्ये नामनिर्देशन कक्ष स्थापन करण्यात आला असून, विविध सोयीसुविधांनी हा कक्ष सज्ज करण्यात आला आहे. या नामनिर्देशन कक्षाची आज जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पाहणी करून आवश्यक त्या सर्व सूचना संबंधित अधिकारी –कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत. यावेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. ******

No comments: