06 March, 2024

जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत सरकळी येथे बाल कायद्यांची जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि 06 : जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत हिंगोली तालुक्यातील सरकळी येथील सत्यगणपती माध्यमिक विद्यालयात बाल कायद्यांबाबत जनजागृती करण्यात आली . या कार्यक्रमात विद्यालयातील विद्यार्थ्यांना बाल विवाह म्हणजे काय, विवाहाचे योग्य वय, बालविवाह होण्याची कारणे, बाल विवाहामुळे होणारे दुष्परिणाम, बाल विवाह केल्यास किंवा बाल विवाहाच्या कार्यात सहभागी झाल्यास एक लाख रुपये दंड व दोन वर्षे सक्त मजुरीची शिक्षा याबाबत माहिती दिली. तसेच या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक आणि शहरी भागासाठी बाल विकास प्रकल्प अधिकारी यांना बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी नियुक्त करण्यात आलेले आहेत. त्यांना सहाय्यक म्हणून अंगणवाडी सेविका असतात. या सर्वांनी आपापल्या कार्यक्षेत्रात बालविवाह होणार नाही या बाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 विषयी माहिती दिली. बालकांना दिलेली माहिती ही दीर्घ काळासाठी बालकांच्या स्मरणात राहावी यासाठी विद्यार्थ्यांकडून जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्त्या रेशमा पठाण यांनी विविध कृती करुन घेतल्या व बालविवाहाच्या परिणामाविषयी सहज व सोप्या पध्दतीने विद्यार्थ्यांना माहिती दिली . यावेळी जिल्हा महिला व बाल विकास विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेविषयी आणि आपल्या सभोवताली कुठेही बाल विवाह होत असेल तर चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्रि क्रमांकावर माहिती दिली पाहिजे. टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती ही गोपनीय ठेवण्यात येत असल्याबाबतची माहिती जिल्हा बाल संरक्षण कक्षातील डाटा एन्ट्री ऑपरेटर राहुल सिरसाट यांनी दिली. कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.वी.खडसे, शिक्षक आर. डी, डाखुरे व एस. एस. उबाळे व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

No comments: