09 April, 2018

केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी - खासदार राजीव सातव



केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांची प्रभावी अमंलबजावणी करावी
                                                                                - खासदार राजीव सातव
        हिंगोली,दि.09: केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजनांचा लाभ अधिकाधिक लाभार्थ्यांना मिळावा यासाठी या योजना प्रभावीपणे राबवाव्यात, असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार राजीव सातव यांनी दिले.
            जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, हिंगोली यांचेवतीने आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची (दिशा) बैठक खासदार राजीव सातव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी एम.एम, देशमुख आणि उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) पांडुरंग बोरगावकर, उपजिल्हाधिकारी (नरेगा) खुदाबक्श तडवी यांची उपस्थिती होती.
            यावेळी श्री. सातव म्हणाले की, केंद्राच्या ग्रामीण व शहरी भागासाठी अनेक योजना आहेत. परंतू या योजनेचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत. त्याकरीता एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम व इतर केंद्र पुरस्कृत योजना अंतर्गत उपलब्ध निधीतील तरतुदीतून जिल्ह्यात योजना राबविण्यात येणे आवश्यक आहे. नरेगा अंतर्गत वैयक्तिक विहिरींची योजना राबविण्यात याव्यात. तसेच नरेगा अंतर्गत संबंधीत यंत्रणांनी पाणंद रस्ते आणि शौच खड्यांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावीत. विद्युत विभागाच्या कामकाजाबद्दल नाराजी व्यक्त करत विद्यूत विभागाने जिल्ह्यातील सर्व शहरी आणि ग्रामीण भागातील विज जोडणी करुन ज्या ठिकाणी ट्रॉन्सफार्मरची आवश्यकता आहे त्याठिकाणी त्वरीत ट्रॉन्सफार्मर बसविण्याची कार्यवाही करावी.  प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरु असलेल्या कामांना गती देवून कामे पूर्ण करण्याच्या सूचना. खासदार राजीव सातव यांनी यावेळी दिल्या.
            आमदार श्री. मुटकुळे म्हणाले की, यंत्रणांनी दिलेले कामे नियोजन करुन वेळेत पूर्ण करावीत. म्हणजे प्राप्त झालेला निधी वेळेत खर्च होईल. तसेच विकास कामे प्रलंबित न ठेवता पाठपुरावा करुन सदर कामे पूर्ण करावीत.
            जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम आणि केंद्र पुरस्कृत योजना जिल्ह्यात राबवितांना सर्व संबंधीत यंत्रणांनी समन्वय ठेवून विकास कामे वेळेत पूर्ण करावीत.
            यावेळी खासदार सातव यांनी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापनाचा कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम निर्मल भारत अभियान, राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण कार्यक्रम, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्व शिक्षा अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रशासन योजना, इंदिरा आवास योजना, पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना यासह अन्य केंद्रशासन पुरस्कृत योजनांचा प्रगतीचा आढावा घेतला.
            यावेळी जिह्यातील पंचायत समितीचे सभापती, समितीचे अशासकीय अध्यक्ष, विविध विभागांचे खाते प्रमुख उपस्थित होते.

****


No comments: