04 April, 2018


‘उभारी’ उपक्रमातून जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण

        हिंगोली,दि.04: आत्मत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या मानसिक धैर्याला व त्यांच्या कुटुंबियांच्या सबलीकरणासाठी शासन, प्रशासन सर्व पद्धतीचे सहकार्य करण्यासाठी मराठवाडा विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या सकंल्पनेतून ‘उभारी’ या उपक्रमातंर्गत आज जिल्ह्यातील प्रत्येक आत्महत्याग्रस्त कुंटूंबीयांची अधिकाऱ्यांनी भेट घेतली.
            या उपक्रमातंर्गत जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी कळमनुरी तालूक्यातील मौ. डोंगरगावपुल येथील मयत शेतकरी संजय भानुदास साखरे आणि मौजे येलकी येथील मयत शेतकरी विठ्ठल जगदेव माने यांच्या कुंटूंबीयांची आज भेट घेवून त्यांच्या समस्या जाणुन घेवून त्यांच्या शासनाकडून काय अपेक्षा आहेत यांची माहिती घेतली.
            यावेळी मौ. डोंगरगावपुल येथील मयत शेतकरी संजय भानुदास साखरे यांच्या कुंटूंबीयांकडे शेती असून त्यांनी दुग्धव्यवसाय करण्याची इच्छा असून त्याकरीता शेळी, गाई-म्हशी या योजनेचा लाभ देण्याची मागणी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्याकडे केली. सदर कुटूंबाच्या मागणीनुसार त्यांना सदर योजनेचा लाभ देण्यासाठी संबंधीतांना सूचना दिल्या. तसेच संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभ देवून मुलांच्या शिक्षणासाठी सिध्दीविनायक न्यास अंतर्गत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याबाबत तहसीलदार यांना जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी सूचना दिल्या.
            मौजे येलकी येथील मयत शेतकरी विठ्ठल जगदेव माने यांच्या कुंटूंबीयांच्या आर्थिक उन्नतीसाठी जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी त्यांना रेशीम शेती करण्याबाबत प्रवृत्त केले असता त्यांनी त्यास सहमती दर्शवीली. त्यानुसार या कुंटूंबाला तात्काळ रेशीम शेती करण्याकरीता योजनेचा लाभ देण्याबाबत जिल्हाधिकारी भंडारी यांनी संबंधीतांना सूचना दिल्या.
            यावेळी जिल्हाधिकारी भंडारी म्हणाले की, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांच्या मानसिक धैर्याला उभारी देवून त्यांच्या कुंटुंबाना सक्षम करण्यासाठी शासन, प्रशासन सर्व पद्धतीचे सहकार्य करणार आहे. यापुढे प्रत्येक महिन्याला जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना प्रत्यक्ष जाऊन अधिकारी भेटणार असून त्यांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत आत्महत्याग्रस्त कुटुंब ठरविण्याचे निकष, घर आणि शेतजमीन, कर्जाची उपलब्धता, उपजीविकेसंबंधीचे प्रश्न, सरकारी योजनांचा लाभ, वारसा नोंदी, शेतीच्या योजनांचा लाभ, महिलांचे अर्थसहाय्य/ बँक कर्जाबाबतचे प्रश्न, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिलांचे आरोग्य व उपजीविका आदीबाबात या उभारी उपक्रमातंर्गत शासन प्रशासन सहकार्य करणार असल्याचे ही श्री.  भंडारी यावेळी म्हणाले.
            यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन पांडुरंग बोरगावकर आणि तहसीलदार प्रतीभा गोरे आदींची उपस्थिती होती.

 

*****

No comments: