16 April, 2018

हॉर्टसॅप प्रकल्पद्वारे केळी पिकाचे किडरोग व व्यवस्थापन

हॉर्टसॅप प्रकल्पद्वारे केळी पिकाचे किडरोग व व्यवस्थापन
 हिंगोली, दि.16: फलोत्पादन पिकावरील किडरोग व व्यवस्थापन प्रकल्प (हॉर्टसॅप) हिंगोली जिल्ह्यामध्ये  2014-15 पासून केळी या पिकावर राबविल्या जात असून जिल्ह्यात कळमनुरी व वसमत तालुक्यात केळी या पिकाचे क्षेत्र असल्यामुळे ह्या पिकावरील किडरोग सर्वेक्षक सल्ला व व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. प्रकल्पात एम. डी. एस. फॅसीलीटीज अमरावती या संस्थेकडून 1 संगणक प्रचालक व 2 किड सर्वेक्षक निवड केली असून उपविभाग स्तरावर किड नियंत्रक तथा कृषि पर्यवेक्षक श्री. के.एच. बोथीकर यांचे मार्फत सनियंत्रण व देणे, सर्वेक्षण अहवाल सं.प्र. द्वारे भरणे इत्यादी कामे करण्यात येत आहेत.
        केळी या पिकाचे सर्वेक्षण करुन हंगामनिहाय किडरोगांच्या प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांना वेळीच उपाययोजना सुचविणे, किडरोगाच्या आकस्मिक प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान टाळणे, किडरोगांचा प्रादुर्भाव वेळीच लक्षात आल्याने पुढील संभाव्य नुकसान टाळून उत्पादनात वाढ करणे हा यामागील उद्देश आहे.
            केळी पिकासाठी पाणी व्यवस्थापन देखील महत्वाचे असून केळी पिकास एकूण 1800 ते 2200 मि.मी. पाण्याची आवश्यकता असते. केळीसाठी ठिबक सिंचन अत्यंत उपयुक्त असून ठिबक सिंचनासाठी सुक्ष्म नलीका पध्दतीपेक्षा (मायक्रोट्युब) ड्रिपर किंवा इनलाईन ड्रिपरचा वापर अधिक योग्य आहे. बाष्पीभवनाचा वेग, जमीनीची प्रतवारी, पिकाच्या वाढीची अवस्था इ. बाबीवर केळीची पाण्याची गरज अवलंबुन असते.
अ.क्र.
पाणी देण्याची वेळ
केळीसाठी पाण्याची गरज (लि. प्रती झाड प्रती दिवस)
1.
1 ते 4 महिने
4.5 ते 6.5
2.
5 ते 9 महिने
9  ते 11
3.
10 वा महिना
14 ते 16
4.
11 वा महिना
18 ते 20
5.
12 वा महिना
21 ते 24
वरील पाण्याची मात्रा मार्गदर्शक असून बाष्पीभवनाचा वेग जमीनीचा प्रकार पिक वाढीची अवस्था यानुसार योग्य तो बदल करावा.
        पिवळ्या करप्या रोगामुळे झाडावरील कार्यक्षम पानांची संख्या झपाट्याने कमी होऊन अन्न निर्मीतीच्या प्रक्रियेत बाधा निर्माण होते. फळामध्ये गर भरत नाही, फळाचा दर्जा खालावतो, रोगाची तिव्रता वाढल्यास घड वाढीवर विपरीत परिणाम होऊन घडातील फळे अपरिपक्व अवस्थेत पिकू लागतात. करपा रोगामुळे एकूण उत्पादन व गुणवत्तेवर परिणाम होऊन मोठे आर्थीक नुकसान होण्याची देखील शक्यता असते.
            यावर उपाययोजनाकरीता करपा रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मीक व्यवस्थापन सामुदायीकरित्या करणे गरजेचे आहे. शिफारस केलेल्या (1.5 मी X 1.5 मी) अंतरावर केळी लागवड करावी. पहिली फवारणी 10 ग्रॅम कार्बेन्डेझिम + 10 मि.ली. स्टिकर एकत्रित द्रावणाची फवारणी करावी. रोगाची तिव्रत्ता अधिक असल्यास प्रती 10 लि. पाण्यात प्रोपीकोनझॉल 5 मि.ली. किंवा कार्बेन्डेझीम 5 ग्रॅम + 100  मि.ली. मिनरल ऑईल या औषधाच्या फवारण्या कराव्यात.
केळी उत्पादक शेतकऱ्यांनी प्रकल्पाअंतर्गत माहितीचा उपयोग करुन घ्यावा व किडरोग नियंत्रणात आणून उत्पादनात वाढ करणे शक्य असल्याचे उपविभागीय कृषि अधिकारी श्री. यु.जी. शिवनगावकर व प्रकल्प कृषि पर्यवेक्षक श्री. के.एच.  बोथीकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
00000


No comments: