31 October, 2017

हिंगोली येथे राष्ट्रीय एकता दौड संपन्न
            हिंगोली दि.31:  सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त हिंगोली येथील अग्रसेन चौक येथे जिल्हाधिकारी अनिल भंडारी आणि आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर यांच्याहस्ते राष्ट्रीय एकता दौडचा शुभारंभ झाला यावेळी पोलीस अधिक्षक अरविंद चावरिया यांच्यासह अधिकारी-कर्मचारी तसेच जेष्ठ नागरिक व महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थी - विद्यार्थीनी उपस्थित होते.
            प्रारंभी सरदार वल्लभभाई पटेल आणि माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. आणि राष्ट्रीय ऐकतेची शपथ घेण्यात आली. हिरवी झेंडी दाखवून दौडला सुरुवात झाली. सदर दौड अग्रसेन चौक येथून इंदिरा गांधी चौक मार्गे जाऊन महात्मा गांधी चौक येथे विसर्जन करण्यात आले.

*****
जिल्हाधिकारी कार्यालयात
सरदार वल्लभभाई पटेल आणि स्व. इंदिरा गांधी यांना अभिवादन

        हिंगोली, दि. 31 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आणि स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री. मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी उध्दव घुगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) गोविंद रणवीरकर आदिसह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
            जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी पुढीलप्रमाणे राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली : मी सत्यनिष्ठापूर्वक शपथ घेतो की, मी राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित राखण्यासाठी स्वत:ला समर्पित करीन आणि माझ्या देशवासियांमध्ये हा संदेश पोचविण्यासाठी देखील भरीव प्रयत्न करीन. मी ही शपथ आपल्या देशाची एकता टिकवून ठेवण्याच्या भावनेने घेत आहे जी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दूरदृष्टी व कार्यांमुळे राखणे शक्य झाले आहे. तसेच मी माझ्या देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्याकरिता माझे स्वत:चे योगदान देण्याचा सुध्दा सत्यनिष्ठापूर्वक संकल्प करीत आहे.

*****

27 October, 2017

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यांना सैन्य व पोलीस भरतीपूर्व
प्रशिक्षणाकरिता अर्ज करण्याचे आवाहन
हिंगोली, दि. 27 : जिल्ह्यातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील युवक / युवतींना सैन्य पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाकरिता शासन निर्णय आदेशाचे अधीन राहून खालील अटी शर्तीची पुर्तता करणाऱ्याच उमेदवारांची निवड करण्यात येईल.
1) उमेदवार हा महाराष्ट्रातील अनुसूचित जाती नवबौध्द घटकातील असावा. 2) उमेदवार हा 18 ते 25 वयोगटातील असावा. 3) उमेदवाराची उंची पुरुष 165 से.मी. महिला 155 से.मी. असावी. 4) उमेदवाराची छाती पुरुष 79 से.मी. फुगवून 84 से.मी. असावी. 5) शैक्षणिक पात्रता इयत्ता 12 वी उत्तीर्ण असावा. 6) जातीचा दाखला, रहिवासी दाखला, सेवा योजन कार्यालयांतर्गत नाव नोंदणी दाखला ओळखपत्राची सत्यप्रत आवश्यक राहिल. 7) उमेदवार शारिरिक दृष्टया निरोगी सक्षम असावा. 8) वार्षिक कौंटुंबिक उत्पन्न 1 लाख पर्यंत असावे.
उमेदवारांना दिनांक 06 नोव्हेंबर, 2017 पासून सुरू होणाऱ्या प्रशिक्षणासाठी श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अंबादेवी मंदिराजवळ, अमरावती येथे स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे लागेल. प्रशिक्षणासाठी निवड झाल्यास सदर प्रशिक्षणाचा कालावधी हा तीन महिन्यांचा असून प्रशिक्षण हे शासनाच्या वतीने होणार आहे. प्रशिक्षणार्थीस जाण्या-येण्याचा कोणताही भत्ता दिला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
वरील अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक पात्र उमेदवारांनी प्रशिक्षणासाठी आवश्यक असणारे अधिकृत पत्र मिळविण्यासाठी दिनांक 03 नोव्हेंबर, 2017 पर्यंत कार्यालयात विहीत नमून्यात अर्ज सादर करावा. सदर अर्जाचा नमुना सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात कार्यालयीन वेळेत नि:शुल्क उपलब्ध असून विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या अर्जांची दखल घेतली जाणार नाही याची संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.    

***** 
बळीराजाला साथ प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची

        प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे या उद्देशाने सन 2015-16 पासून सूक्ष्म सिंचन योजना प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना या केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये समाविष्ट केली आहे. शेतकऱ्यांकडून अर्ज प्राप्त करण्यासाठी ई-ठिबक आज्ञावली दि. 1 मे 2017 पासून सुरु करण्यात आलेली आहे. या आज्ञावलीद्वारे दि. 31 डिसेंबर 2017 पर्यंत अर्ज करता येणार आहेत. या योजनेबद्दलची अधिक माहिती जाणुन घेऊ या...
केंद्र व राज्याचे अर्थसहाय्याचे प्रमाण : प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेच्या केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 करण्यात आलेले आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमध्ये प्रति थेंब अधिक पीक अंतर्गत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 2015-16 पासून राज्यामध्ये राबविण्यात येत असून सन 2017-18 मध्ये सदर योजना राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाने राज्यासाठी 380 कोटी निधीची तरतूद केलेली आहे. केंद्र हिस्सा रक्कम 380 कोटी व त्यास पूरक राज्य हिस्सा रक्कम 240.67 कोटी असा एकूण 620.67 कोटी निधी उपलब्ध होणार आहे.
मराठवाडा विभागासाठी 100 टक्के राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना : दि. 14 ऑक्टोबर 2015 रोजीच्या शासन निर्णयान्वये सन 2016-17 पासून मराठवाडा विभागातील 8 जिल्ह्यांसाठी 100 टक्के राज्य पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना तीन वर्षाच्या कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत सन 2017-18 वर्षासाठी 143.50 कोटी निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. याप्रमाणे सन 2017-18 साठी एकूण रुपये 764.17 कोटी निधी सूक्ष्म सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. उपलब्ध होणाऱ्या निधीतून सन 2017-18 वर्षामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेंतर्गत 2.61 लक्ष लाभार्थींच्या शेतावर 2.10 लक्ष हेक्टर क्षेत्रावर तर मराठवाड्यात सूक्ष्म सिंचन योजनेंतर्गत 60 लक्ष लाभार्थींच्या शेतावर 48 लक्ष हेक्टर क्षेत्रावर सूक्ष्म सिंचन संच बसविण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. 
अनुदान मर्यादा : सन 2017-18 साठी या योजनेअंतर्गत अनुदानाचे प्रमाण अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी 55 टक्के व इतर भूधारक शेतकरी 45 टक्के प्रमाण आहे. 
जलद व पारदर्शक अंमलबजावणीकरिता कागदपत्रांची संख्या कमी : राज्य शासनाने सूक्ष्म सिंचन योजनेच्या अंमलबजावणीमध्ये अधिक सुटसुटीतपणा व सुसूत्रता आणून योजना पारदर्शकरित्या व अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यादृष्टीने योजनेच्या गतिमान अंमलबजावणीसाठी ऑनलाईन प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या असून शेतकऱ्यांना शासनास सादर करावयाच्या कागदपत्रांची संख्या कमी करण्यात आली आहे. योजना अंमलबजावणीतील काही टप्पे कमी करण्यात आलेले आहेत.
अर्ज स्वीकृतीचा कालावधी : सन 2017-18 मध्ये सूक्ष्म सिंचन संच बसविण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यास व शेतकऱ्यांकडून अर्ज स्वीकृती करण्यासाठी ई-ठिबक आज्ञावली दि. 1 मे 2017 पासून सुरु करण्यात आली असून दि. 31 डिसेंबर, 2017 पर्यंत अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज : सन 2017-18 पासून लाभार्थींना नोंदणीसाठी युजर आयडी व पासवर्ड देण्यात येणार आहेत. यासाठी लाभार्थींचा आधार क्रमांक हाच युजर आयडी असेल. शेतकऱ्यांकडून अर्ज फक्त ई-ठिबक आज्ञावलीमध्ये ऑनलाईन प्रणालीद्वारेच स्वीकारण्यात येणार आहेत.
                                                                                                                                    --2
                                                            --2--
एसएमएसद्वारे माहिती : लाभार्थींनी ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर स्वयंचलित संगणकीय प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध अनुदानाच्या मर्यादेत ऑनलाईन पूर्वसंमती प्रदान करण्यात येणार आहे. लाभार्थीने योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी केल्यापासून प्रत्यक्षात सूक्ष्म सिंचन संच बसवून अनुदानाची मागणी केल्यानंतर योग्य ती पडताळणी करुन अनुदानाची रक्कम त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावरील कार्यवाहीबाबत लाभधारकास एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे. पूर्वसंमती प्राप्त झाल्यानंतर लाभधारकास सन 2017-18 मध्ये नोंदणीस/नोंदणी नुतनीकरणास मान्यता देण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन संच उत्पादकामधून त्यांच्या पसंतीच्या उत्पादकाकडून त्यांनी प्राधिकृत केलेल्या वितरक/विक्रेत्याकडून 30 दिवसाच्या आत सूक्ष्म सिंचन संच बसविणे आवश्यक असणार आहे. लाभार्थीने सूक्ष्म सिंचन संच बसविल्यानंतर बील इन्व्हाईस ऑनलाईन प्रणालीत नोंदवायचे आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांसह सविस्तर प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावयाचा आहे.
अनुदान प्रस्तावासोबत सादर करावयाचे कागदपत्रे : अनुदान प्रस्तावासोबत शेतकऱ्यांच्या मालकी हक्काचा 7/12 व 8 अ उतारा, इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्स्फर (ईएफटी) प्रणालीची सुविधा असलेल्या राष्ट्रीयकृत, शेड्यूल्ड किंवा सहकारी बँकेत खाते उघडल्याचा पुरावा. शेतकऱ्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स प्रत, उत्पादक कंपनीने/कंपनी प्रतिनिधीने ग्राफ पेपरवर स्केलसह तयार केलेला सूक्ष्म सिंचन संचाचा आराखडा, सूक्ष्म सिंचन संच साहित्याचे सर्व करासहीत कंपनीच्या अधिकृत वितरकाने स्वाक्षरीत केलेले बील. शेतकऱ्यांनी निवड केलेल्या उत्पादक कंपनीशी अथवा कंपनी प्राधिकृत प्रतिनिधीशी केलेला करारनामा ही प्रस्तावासोबत कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.
अनुदानाची रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर जमा : लाभधारकाने पूर्वमान्यता मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत सूक्ष्म संच न बसविल्यास त्याची पूर्वसंमती आपोआप रद्द होईल. तथापि त्याला पुन्हा अर्ज करता येईल. तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, कृषी अधिकाऱ्यांमार्फत प्राप्त प्रस्तावातील कागदपत्रांची तपासणी करतील. तालुका कृषी अधिकारी कृषी पर्यवेक्षकांमार्फत त्या त्या कृषी पर्यवेक्षकाच्या कार्यक्षेत्रातील बसविण्यात आलेल्या सूक्ष्म सिंचन संचाची 10 दिवसात मोका तपासणी करुन तपासणी अहवाल संगणकीय प्रणालीवर नोंदवतील. त्यानंतर अनुदानाची परिगणना करुन तालुका कृषी अधिकारी लाभधारकास देय असणाऱ्या अनुदानाची रक्कम ऑनलाईन पद्धतीने थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करतील.
पूर्वसंमती आवश्यक : पूर्वमान्यता न घेता शेतकऱ्याने सूक्ष्म सिंचन संचाची उभारणी केली असल्यास व अनुदानासाठीचा प्रस्ताव सादर केला असेल तर अशा शेतकऱ्यांस अनुदान अनुज्ञेय असणार नाही.
पाच हेक्टर क्षेत्राला लाभ देय : सूक्ष्म सिंचन यंत्रणा बसविण्यासाठी प्रती लाभार्थी 5 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभ देय राहील. सूक्ष्म सिंचन संच घटकाचे आयुर्मान सात वर्षे करण्यात आलेले आहे. त्यामुळे आता ज्या लाभधारकाने 5 हेक्टर मर्यादेत सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेतलेला आहे, अशा लाभधारकास सात वर्षांनंतर पुन्हा सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेता येईल.
आयुर्मान संपण्यापूर्वी संचाची विक्री करता येणार नाही : सूक्ष्म सिंचन संचाचे निश्चित केलेले आयुर्मान संपण्यापूर्वी लाभधारकास सूक्ष्म सिंचन संचाची विक्री करता येणार नाही. सूक्ष्म सिंचन संचाचे निश्चित केलेले आयुर्मान संपण्यापूर्वी संचाची विक्री केल्यास अशा लाभधारकाविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित लाभधारकास भविष्यात शासनाच्या कोणत्याही योजनेअंतर्गत शासकीय सहाय्य मिळणार नाही, अशा लाभधारकाचे नाव काळ्या यादीत टाकण्यात येईल. उपलब्ध असलेल्या पाण्याचा योग्य पद्धतीने वापर करुन जास्तीत जास्त पिकांना सूक्ष्म सिंचन उपलब्ध करुन देवून पाण्याचा मोठ्या प्रमाणात होणारा अपव्यय थांबवून कमी पाण्यावर उत्पादन क्षमता वाढविणे व जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली आणणे हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. 

                                                                                                                         जिल्हा माहिती कार्यालय,
                                                                                                                                   हिंगोली

*****
 

26 October, 2017

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 26 : सन 2014-15, सन 2015-16 व सन 2016-17 या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागामार्फत प्रतिवर्षी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार देण्याची योजना कार्यान्वित असून यामध्ये राज्यातील सर्वोत्कृष्ट खेळाडू, साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूंसह, संघटक/कार्यकर्ते, उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक/कार्यकर्ती यांचेसाठी जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार तसेच जेष्ठ क्रीडा महर्षीकरीता शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो.
            सन 2014-15, सन 2015-16 व सन 2016-17 या वर्षासाठी मान्यता प्राप्त खेळांच्या अधिकृत राज्य संघटनेमार्फत त्या-त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कनिष्ठ व वरीष्ठ गटातील पदक विजेते पुरुष व महिला खेळाडू साहसी उपक्रम, दिव्यांग खेळाडूसह संघटक/कार्यकर्ते, क्रीडा मार्गदर्शक, महिला मार्गदर्शक व संघटक कार्यकर्ती यांचे विहित नमुन्यातील अर्ज संबंधित राज्य संघटनेच्या कार्यकारणीच्या ठरावासह दि. 30/11/2017 अर्जदाराने आपल्या कामगीरीचा तपशील देउन विहित नमुन्यात अर्ज ऑनलाईन पद्धतीने www.mumbaidivsports.com वेबसाईटवर उपलब्ध करुन दिलेल्या लिंक वर अर्ज सादर करावा. तसेच ऑन लाईन अर्जाची एक प्रत अर्जदाराने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, हिंगोली या कार्यालयात दि. 05 डिसेंबर 2017 पुर्व स्वयंसांक्षाकित  प्रमाणपत्रासह सादर करावी या बाबत अधिक माहितीसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संकेत स्थळावर शासन निर्णय क्रमाक राक्रीधो-2012/प्र.क्र.158/12/क्रीयुसे-02 दि. 16/10/2017 चे अवलोकन करावे. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर (www.maharashtra.gov.in) वर उपलब्ध असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक 201710161812538321 असा आहे.
तसेच सन 2014-15 या पुरस्कार वर्षासाठी ज्यांनी अर्ज सादर केलेले होते अशांनी पुन्हा नवीन शासन निर्णयाच्या नियमावलीनुसार नव्याने अर्ज सादर करावयाचे आहे यांची कृपया नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

*****
राष्ट्रीय एकता दिवसानिमित्त एकता दौडचे आयोजन

हिंगोली, दि. 26 : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने मंगळवार दि. 31 ऑक्टोंबर 2017 या दिवशी राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा करण्याचा संकल्प शासनाने व्यक्त केला आहे. त्या निमित्ताने शहरात जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ, एकता दौड व पोलिस तसेच तत्सम यंत्रणांचे सायंकाळचे परेड संचलन, मानवंदना या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहेत व त्याच बरोबर हा दिवस स्व. इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी दिवस असल्याणे राष्ट्रीय संकल्प दिवस म्हणून मिरवणुक, देशभक्तीपर गाणी व सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व असलेल्या वक्त्यांची व्याख्याने इ. कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे असल्याने हिंगोली जिल्ह्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणी म्हणजे अग्रेसेन चौक येथे राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन दि. 31 ऑक्टोंबर 2017 रोजी सकाळी 7.00 वा. करण्यात आले आहे. एकता दौडची सुरुवात खासदार, जिल्हा परिषद अध्यक्षा, आमदार, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधिक्षक, नगराध्यक्ष व जिल्ह्यातील विविध शासकिय व निमशासकिय अधिकारी / कर्मचारी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
एकता दौडचे मार्ग पुढील प्रमाणे असणार आहे. अग्रेसन चौकापासून सुरुवात, बसस्टँड, स्व. इंदीरा गांधी चौक आणि महात्मा गांधी चौक येथे समारोप होणार आहे. तरी सदरील राष्ट्रीय एकता दौड कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयातील मुला-मुलींनी, जिल्ह्यातील नागरीकांनी, खेळाडूंनी, स्वयंसेवी संस्था, युवक मंडळे, क्रीडा मंडळे यांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

*****
अनुसूचित जातीच्या बचत गटांना 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर वाटप

        हिंगोली, दि. 26 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने सन 2017-18 मध्ये अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदनीकृत बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर मिनी ट्रॅक्टर वाटप करण्यात येणार आहेत.
                जिल्ह्यातील इच्छूक व नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी खालील अटी व शर्तीची पुर्तता करणे आवश्यक आहे. 1) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांचा नोंदणीकृत बचतगट असावा, बचतगटाचे खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे.  2) गटामध्ये किमान 10 किंवा त्यापेक्षा जास्त सदस्य असावेत त्यापैकी 80 टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील असावेत 3) गटातील सदस्य महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत. 4) सदस्यांचे जातीचे प्रमाणपत्र सक्षम अधिकारी यांचे आवश्यक. 5) गटातील प्रत्येक सदस्याचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असावे व ते आधारक्रमांकाशी सलग्न असावे. 6) गटाने / गटातील सदस्यांनी यापुर्वी या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 7) निवडीनंतर गटाला 10 टक्के रक्कमेचा डिमांड ड्राफ्ट तात्काळ द्यावा लागेल. अर्ज उद्दिष्टापेक्षा जास्त पात्र ठरल्यास गटाची निवड ही ड्रॉ पध्दतीने करण्यात येईल.
                वरील अटी व शर्ती पुर्ण करणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील बचत गटांनी तसेच यापुर्वी अर्ज सादर केले परंतु लाभ न मिळालेल्या गटांनी नव्याने अर्ज सादर करावेत. अर्ज सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली या कार्यालयामधुन विनामुल्य घेऊन जावेत व परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 18 नोव्हेंबर, 2017 पर्यंत शासकीय सुट्टी वगळून कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याण, सहाय्यक आयुक्त, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****     

25 October, 2017

रेशीम उत्पादनातून आर्थिक वाटचाल

हिंगोली जिल्ह्यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, ज्वारी इत्यादी कोरडवाहू तर ऊस, हळद, केळी ही पाण्याची पिके घेतली जातात. अलीकडील काही काळात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल सोयाबीन व हळद पिकाकडे अधिक वाढलेला दिसून येत आहे. तसे पाहता हिंगोली जिल्ह्याचे सिंचित क्षेत्र सुमारे 14 ते 15 टक्केच्या आसपास आहे. केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकारातून हिंगोली जिल्ह्यात ही रेशीम कोषच्या उत्पादनाला प्रोत्साहन दिले जात असून सद्यस्थितीत सुमारे 300 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड करून शेतकरी रेशीम कोषचे उत्पादन घेत आहेत. रेशीम कोषच्या उत्पादनातून शेतकऱ्यांच्या हातात प्रतीमहा नगदी पैसा येत असून रेशीमचे उत्पादन घेणारे शेतकऱ्यांची आर्थिक स्वावलंबनाकडे वाटचाल सुरू झालेली आहे. कळमनुरी तालुक्यातील घोळवा गावातील प्रभू गुलाबराव मगर या शेतकऱ्यांकडे पाहिले असता याची प्रचिती येते.
घोळवा गावाचा शिवार तसा हलका-मध्यम व मुरमाड जमिनीचा आहे. या गावातील डिगंबर मस्के या शेतकऱ्याने सन 1996 पासून रेशीम शेतीचे उत्पादन घेण्यास सुरूवात केली. एका एकरावर तुतीची लागवड करून सिंचनाची व्यवस्था केली. कमी पाण्यावर ही तुतीची चांगली जोपासना करून रेशीम अंडी कोषच्या माध्यमातून वार्षिक 3 ते 4 लाखाचे उत्पन्न घेऊन गावातील इतर शेतकऱ्यांसमोर एक चांगला आदर्श ठेवला.
शेतकरी दिगंबर म्हस्के यांचा तुती शेतीचा आदर्श घेऊन घोळवा गावातील शेतकरी प्रभू गुलाबराव मगर यांनी आपल्या माळरानावरील पाच एकर जमिनीपैकी दीड एकरावर पाण्याची व्यवस्था करून तुतीची लागवड केली. याकरिता शेतकरी मस्के व जिल्हा रेशीम कार्यालय यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन तुतीची जोपासना केली. शेतामध्ये एक 50X25 फुटाचे एक शेड तयार करून त्यामध्ये रेशीम अंडीपुंज आणून रेशीम किड्यांची जोपासना केली. रेशीम कोषची पहिलीच बॅच दीड क्विंटलची झाली. सदरील कोष बेंगलोर जवळील राम नगरच्या बाजारपेठेमध्ये जाऊन विक्री केली. या रेशीम कोषाला प्रति किलो 307 रु. दर मिळाला त्यामुळे पहिल्या बॅचचे उत्पन्न जवळपास 45 हजारापर्यंत गेले व याकरिता कालावधी लागला फक्त 28 दिवस !
हे 45 हजाराचे उत्पन्न पाहून शेतकरी मगर यांना आनंद व्यक्त करण्यास शब्द अपुरे पडू लागले. कारण काही वर्षापूर्वी दुसऱ्यांच्या शेतावर सालगडी म्हणून वार्षिक 9 हजारावर राबणाऱ्यास दीड महिन्यातच 45 हजार रुपये हाती आली व ते ही स्वत:च्या शेतात श्रम करून ! सद्यस्थितीमध्ये वर्षातून किमान 6 बॅच घेत असून वार्षिक सरासरी अडीच ते तीन लाखाचे उत्पन्न मिळवित आहेत. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती मध्ये चांगली सुधारणा झालेली असून ते स्वत:च्या शेतात पत्नीच्या मदतीने रेशीम शेती करीत आहेत.
श्री. मगर यांच्या जीवनात तुती रेशीम लागवडीच्या माध्यमातून आमुलाग्र बदल झालेला आहे. काही वर्षापूर्वी 9 हजारावर वार्षिक सालगडी म्हणून काम केलेल्या माणसाकडे आज स्वत:ची दुचाकी असून आर्थिक सुबत्ता ही आलेली आहे. श्री. मगर यांनी आपल्या मुलांना शिक्षणासाठी हिंगोली शहरात ठेवण्यात आले आहे. तसेच श्री. मगर यांना रेशीम शेतीचा अभिमान आहे. पाच एकर माळरान जमिनीपैकी दीड एकरात तुतीची लागवड रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली करून वर्षातून 5 ते 6 बॅच उत्पन्न घेऊन वार्षिक उलाढाल खर्च वजा जात 3 लाखापर्यंत आहे. श्री. मगर याना शासकीय पगारदार व्यक्ती इतका दरमहा पगार रेशीम शेतीमुळे मिळत आहे. हे शक्य झालं ते नावीन्यपूर्ण अशा तुती रेशीम कोषमुळे !
  तरी हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी किमान पाण्याची व्यवस्था असल्यास इतर पिके घेण्यापेक्षा हमखास दरमहा हातात पैसे मिळवून देणाऱ्या व कमी पाण्यावर येणाऱ्या रेशीम शेतीकडे वळावे. या माध्यमातून टंचाईच्या परिस्थितीमध्ये ही अगदी कमी पाण्यावर ही आपल्या उत्पन्नात सातत्य ठेवता येते. त्यामुळे जिल्हा प्रशासन व जिल्हा रेशीम अधिकारी कार्यालय शेतकरी वर्गात रेशीम शेती करण्याचे आवाहन करीत आहेत. घोळवा या गावाचे डिगंबर मस्के व प्रभु मगर या शेतकऱ्यांच्या आर्थिक संपन्नतेकडे पाहून इतर शेतकऱ्यांनी त्यांचा आदर्श घेऊन रेशीम शेती करावी.


जिल्हा माहिती कार्यालय
हिंगोली

*****

18 October, 2017

राज्यातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील
- पालकमंत्री दिलीप कांबळे

·         छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 कर्जमाफीसाठी
             पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण

हिंगोली, दि.18: अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने त्यांची सरसकट कर्जमाफी केली आहे. शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शाश्वत उपाययोजना करुन त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी असे केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकूळे, अप्पर जिल्हाधिकारी जी.जी. मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी उध्दव घुगे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खांडेकर, तहसीलदार गजानन शिंदे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री दिलीप कांबळे योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सदरची कर्जमाफी ही देशातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी असून राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या रक्कमेचा लाभ देण्यास आज पासून सुरुवात होत आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांचा प्रोत्साहनपर रक्कमेचा लाभ देखील देण्यात येत आहे. पुर्नगठन केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी विशेष योजना राबविली जात आहे. तसेच कोणताही शेतकरी कर्जबाजारी होवू नये, त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांना सन्मानाने जगता यावं याकरीता शासनामार्फत शाश्वत योजना राबविण्यात येणार आहे .
जिल्ह्यातील कर्जमाफी योजने अंतर्गत दिृ 22 सप्टेंबर, 2017 पर्यंत  एकूण 1,09,385 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच पाच तालुक्यातील एकूण 635 गावातील शेतकऱ्यांच्या नावांचे चावडी वाचन देखील पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक लि. राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँक यांच्या कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीची रक्कम पोहचावी याकरीता ऑनलाईन यंत्रणाकरण्यात आली असून यामुळे पारदर्शी पध्दतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.
पावसाच्या अनियमितेमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांवर संकट येत असतात परंतू शेतकरी बांधवांनी खचून न जाता कामा नये. जलयुक्त शिवार अभियान तसेच विविध योजनांच्या माध्यमातून राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचेही यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
आमदार तान्हाजी मुटकूळे म्हणाले की, शेतकरी हा भविष्यकाळात सावकारासमोर झुकला नाही पाहिजे, म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्ज माफी  केली आहे. या कर्जमाफी मुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.  
यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी जिल्ह्यातील कर्जमाफी योजना व परतफेड सवलत योजने अंतर्गत पात्र 25 शेतकरी कुटूंबांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमास विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शेतकरी सभासद यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****







09 October, 2017

जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची आवश्यकता
                                                                                                -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
         हिंगोली,दि.9: येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी मोठी  संधी आहे. परंतू या पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.   
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 5 ते 25 ऑक्टोबर, 2017 या कालावधीत पर्यटन क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून भारतात ‘पर्यटन पर्व’ साजरा करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानिमित्त सचिव, पर्यटन विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी बैठक आयोजित करून दिलेल्या निर्देशानुसार भारतासह महाराष्ट्र राज्यात स्थानिक पर्यटनाची वाढ व विकास करण्याच्या दृष्टीकोनातून पर्यटन मंत्रालय, नवी दिल्ली, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने 05 ते 25 ऑक्टोबर 2017 या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी ‘पर्यटन पर्व’ साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी भंडारी बोलत होते. यावेळी एम.टी.डी.सी. औरंगाबादचे आर. यु. क्षिरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. देशपांडे, कार्यक्रम अधिक्षक एस.जी. सुर्यवंशी, सांख्यिकी अधिकारी श्री. स. पारवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील हान्सफोर्ड आणि लिव्हिंग्स्टन येथे लिगोने दोन प्रयोगशाळा उभारल्या असून, तिसरी प्रयोगशाळा ही औंढा नागनाथ येथे होत आहे. या प्रयोगशाळेमुळे येणाऱ्या कालावधीत धार्मिक पर्यटनाबरोबर शैक्षणिक पर्यटनाला देखील खुप मोठी संधी प्राप्त होणार असल्याने यासाठी आतापासूनच तयारी करण्याची आवश्यकता आहे. परंतू सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळाची माहिती जगासमोर जाणे आवश्यक आहे. याकरीता जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची व्यापक प्रसिध्दी करण्याची आवश्यकता आहे. याकरीता समाज माध्यमांचा जास्तीत-जास्त उपयोग केल्यास नक्कीच पर्यटन विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.
            हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव ही दोन मोठी धार्मिकस्थळे आहेत. याठिकाणी मोठ्या संख्येने भक्तजण येत असतात. परंतू याठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी आवश्यक तेवढ्या सोयी-सुविधा उपलब्ध नाही. याकरीता या धार्मिक स्थळांचा विकास करण्याची आवश्यकता आहे. यात औंढा नागनाथ शेजारील नागेशवाडी जवळ वन उद्यानाचा विकास केल्यास पर्यटनाला आणखी चालना मिळण्यास वाव आहे. तसेच सिध्देश्वर येथेही पर्यटन वाढविण्यास वाव आहे. तसेच शहरातील लोकांना ग्रामीण भाग आकर्षित करीत असून पर्यटन म्हणुन शेतात राहण्यास पसंती देत आहेत यामुळे कृषि पर्यटनाला देखील आज खुप महत्व प्राप्त झाले आहे.   जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यासाठी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याशेजारील विविध पर्यटन स्थळाचे थीमबेस सर्कीट तयार करणे गरजेचे आहे असे ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यावेळी म्हणाले.
            ‘पर्यटन पर्व’ या संकल्पनेमध्ये  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी पर्यटन’ हि संकल्पना मांडली आहे. यात पर्यटन फक्त आंतरराष्ट्रीय / परदेशी पर्यटकांसाठीच नसून पर्यटनाचा आनंद स्थानिक लोकांनी देखील उपभोगने अपेक्षित आहे. स्थानिक पर्यटकांचा पर्यटनामध्ये सहभाग वाढवून पर्यटनाचा विकास साधण्यासाठी 5 ते 25 ऑक्टोबर 2017 या दिवाळी हंगामातील सुट्टीचा आनंद पर्यटनाद्वारे द्विगुणित करणेसाठी ‘पर्यटन पर्व’ साजरे करण्यात येत आहे. असे एम.टी.डी.सी. औरंगाबादचे श्री. क्षिरसागर यांनी यावेळी माहिती दिली.

*****

08 October, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वच्छता अभियान

        हिंगोली,दि.08: स्वच्छ भारत अभियान अंतर्गत आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. रविवार असूनही जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यांनी हातात झाडू, घासणी, फावडे, घेऊन कार्यालय परिसर स्वच्छ करण्यासाठी उतरले होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी देखील स्वत: हातात ब्रश-घासणी  घेवून कार्यालय परिसराची स्वच्छता केली. नेहमी कार्यालयीन कामकाजात व्यस्त असणारे अधिकारी-कर्मचारी आज साफसफाई करण्यात व्यस्त झाले होते. इमारत परिसरातील भिंतीवर तंबाखु-गुटखा खाऊन जागो-जागी थूंकलेल्या जागी अधिकारी-कर्मचारी यांनी हातात ब्रश घेऊन त्याची साफसफाई केली.


            जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये, तहसील कार्यालये याठिकाणी स्वच्छता मोहिम घेण्यात येत आहे. स्वच्छता हि केवळ मोहिमेपुरती न ठेवता शासकीय कार्यालये सदैव कशाप्रकारे स्वच्छ ठेवता येईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी यांनी आज उत्कृष्टरित्या स्वच्छता मोहिम राबवून परिसर स्वच्छ केला आहे. येणाऱ्या काही दिवसात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेरील परिसराची देखील अशाच प्रकारे साफसफाई करण्यात येईल. या स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने प्रत्येकाने सार्वजनीक ठिकाणी कचरा करायचा नाही तसेच तंबाखू-गुटखा खाऊन भिंतीवर थूंकयाचे नाही असे ठरवून आपले शहर स्वच्छ व सुंदर कसे होईल यासाठी प्रयत्न करावा. असेही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यावेळी म्हणाले.
            प्र. निवासी उपजिल्हाधिकारी लतीफ पठाण यांनी देखील जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणार असून यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी  उपजिल्हाधिकारी (नरेगा) खुदाबक्श तडवी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, नायब तहसीलदार श्री. मिटकरी, सहायक नियोजन अधिकारी श्री. आव्हाड, स्वीय सहायक श्री. बोलके आणि श्री. वानखेडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील आणि नगर परिषदेचे कर्मचारी यांनी या स्वच्छता मोहिमेत सक्रीय सहभाग घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय तथा मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीची स्वच्छता केली.
            नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील यांच्यासह त्यांच्या अधिनस्त अधिकारी-कर्मचारी यांनी या स्वच्छता माहिमेत सक्रीय सहभाग नोंदवून कार्यालय परिसराची स्वच्छता केली.


*****