18 October, 2017

राज्यातील शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील
- पालकमंत्री दिलीप कांबळे

·         छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना-2017 कर्जमाफीसाठी
             पात्र शेतकऱ्यांना पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण

हिंगोली, दि.18: अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य शासनाने त्यांची सरसकट कर्जमाफी केली आहे. शेतकऱ्यांना या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी शाश्वत उपाययोजना करुन त्यांच्या शेतीच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांना सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी असे केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकूळे, अप्पर जिल्हाधिकारी जी.जी. मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी उध्दव घुगे, उपविभागीय अधिकारी प्रशांत खांडेकर, तहसीलदार गजानन शिंदे, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक सुधीर मेत्रेवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री दिलीप कांबळे योजनेबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सदरची कर्जमाफी ही देशातील आजवरची सर्वात मोठी कर्जमाफी असून राज्यातील सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या रक्कमेचा लाभ देण्यास आज पासून सुरुवात होत आहे. तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 25 हजार रुपयांचा प्रोत्साहनपर रक्कमेचा लाभ देखील देण्यात येत आहे. पुर्नगठन केलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जासाठी विशेष योजना राबविली जात आहे. तसेच कोणताही शेतकरी कर्जबाजारी होवू नये, त्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांना सन्मानाने जगता यावं याकरीता शासनामार्फत शाश्वत योजना राबविण्यात येणार आहे .
जिल्ह्यातील कर्जमाफी योजने अंतर्गत दिृ 22 सप्टेंबर, 2017 पर्यंत  एकूण 1,09,385 ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. तसेच पाच तालुक्यातील एकूण 635 गावातील शेतकऱ्यांच्या नावांचे चावडी वाचन देखील पूर्ण झाले आहे. ज्यामध्ये दि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकरी बँक लि. राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण बँक यांच्या कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजनेतील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत कर्जमाफीची रक्कम पोहचावी याकरीता ऑनलाईन यंत्रणाकरण्यात आली असून यामुळे पारदर्शी पध्दतीने पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होणार आहे.
पावसाच्या अनियमितेमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांवर संकट येत असतात परंतू शेतकरी बांधवांनी खचून न जाता कामा नये. जलयुक्त शिवार अभियान तसेच विविध योजनांच्या माध्यमातून राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असल्याचेही यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
आमदार तान्हाजी मुटकूळे म्हणाले की, शेतकरी हा भविष्यकाळात सावकारासमोर झुकला नाही पाहिजे, म्हणून शासनाने शेतकऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कर्ज माफी  केली आहे. या कर्जमाफी मुळे शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.  
यावेळी पालकमंत्री कांबळे यांनी जिल्ह्यातील कर्जमाफी योजना व परतफेड सवलत योजने अंतर्गत पात्र 25 शेतकरी कुटूंबांना कर्जमाफीचे प्रमाणपत्र देवून त्यांचा सत्कार केला.
कार्यक्रमास विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे शेतकरी सभासद यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
****







No comments: