09 October, 2017

जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची आवश्यकता
                                                                                                -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
         हिंगोली,दि.9: येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्यासाठी मोठी  संधी आहे. परंतू या पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले.   
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 5 ते 25 ऑक्टोबर, 2017 या कालावधीत पर्यटन क्षेत्राला केंद्रस्थानी ठेवून भारतात ‘पर्यटन पर्व’ साजरा करण्याची संकल्पना मांडली होती. त्यानिमित्त सचिव, पर्यटन विभाग, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी बैठक आयोजित करून दिलेल्या निर्देशानुसार भारतासह महाराष्ट्र राज्यात स्थानिक पर्यटनाची वाढ व विकास करण्याच्या दृष्टीकोनातून पर्यटन मंत्रालय, नवी दिल्ली, पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने 05 ते 25 ऑक्टोबर 2017 या कालावधीत राज्यात विविध ठिकाणी ‘पर्यटन पर्व’ साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी भंडारी बोलत होते. यावेळी एम.टी.डी.सी. औरंगाबादचे आर. यु. क्षिरसागर, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस. जी. देशपांडे, कार्यक्रम अधिक्षक एस.जी. सुर्यवंशी, सांख्यिकी अधिकारी श्री. स. पारवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. भंडारी म्हणाले की, गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेतील हान्सफोर्ड आणि लिव्हिंग्स्टन येथे लिगोने दोन प्रयोगशाळा उभारल्या असून, तिसरी प्रयोगशाळा ही औंढा नागनाथ येथे होत आहे. या प्रयोगशाळेमुळे येणाऱ्या कालावधीत धार्मिक पर्यटनाबरोबर शैक्षणिक पर्यटनाला देखील खुप मोठी संधी प्राप्त होणार असल्याने यासाठी आतापासूनच तयारी करण्याची आवश्यकता आहे. परंतू सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या जिल्ह्यातील पर्यटनस्थळाची माहिती जगासमोर जाणे आवश्यक आहे. याकरीता जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळांची व्यापक प्रसिध्दी करण्याची आवश्यकता आहे. याकरीता समाज माध्यमांचा जास्तीत-जास्त उपयोग केल्यास नक्कीच पर्यटन विकासाला चालना मिळण्यास मदत होईल.
            हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ आणि नरसी नामदेव ही दोन मोठी धार्मिकस्थळे आहेत. याठिकाणी मोठ्या संख्येने भक्तजण येत असतात. परंतू याठिकाणी येणाऱ्या भक्तांसाठी आवश्यक तेवढ्या सोयी-सुविधा उपलब्ध नाही. याकरीता या धार्मिक स्थळांचा विकास करण्याची आवश्यकता आहे. यात औंढा नागनाथ शेजारील नागेशवाडी जवळ वन उद्यानाचा विकास केल्यास पर्यटनाला आणखी चालना मिळण्यास वाव आहे. तसेच सिध्देश्वर येथेही पर्यटन वाढविण्यास वाव आहे. तसेच शहरातील लोकांना ग्रामीण भाग आकर्षित करीत असून पर्यटन म्हणुन शेतात राहण्यास पसंती देत आहेत यामुळे कृषि पर्यटनाला देखील आज खुप महत्व प्राप्त झाले आहे.   जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्राचा विकास होण्यासाठी व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यातील आणि जिल्ह्याशेजारील विविध पर्यटन स्थळाचे थीमबेस सर्कीट तयार करणे गरजेचे आहे असे ही जिल्हाधिकारी अनिल भंडारी यावेळी म्हणाले.
            ‘पर्यटन पर्व’ या संकल्पनेमध्ये  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी पर्यटन’ हि संकल्पना मांडली आहे. यात पर्यटन फक्त आंतरराष्ट्रीय / परदेशी पर्यटकांसाठीच नसून पर्यटनाचा आनंद स्थानिक लोकांनी देखील उपभोगने अपेक्षित आहे. स्थानिक पर्यटकांचा पर्यटनामध्ये सहभाग वाढवून पर्यटनाचा विकास साधण्यासाठी 5 ते 25 ऑक्टोबर 2017 या दिवाळी हंगामातील सुट्टीचा आनंद पर्यटनाद्वारे द्विगुणित करणेसाठी ‘पर्यटन पर्व’ साजरे करण्यात येत आहे. असे एम.टी.डी.सी. औरंगाबादचे श्री. क्षिरसागर यांनी यावेळी माहिती दिली.

*****

No comments: