*99.79 टक्के मतदान; सातपैकी सहा केंद्रांवर शंभर टक्के मतदान*
हिंगोली, दि. १८ (जिमाका) : विधान परिषदेच्या परभणी-हिंगोली स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी आज झालेल्या मतदानात मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदान केले. सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत झालेल्या मतदानात एकूण 466 मतदारांपैकी 465 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला, त्यामुळे एकूण मतदानाची टक्केवारी 99.79 टक्के इतकी नोंदविण्यात आली.
निवडणुकीसाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील सात मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडली. हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत आणि परभणी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड व पाथरी येथील सहा केंद्रांवर 100 टक्के मतदान झाले. तर सेलू मतदान केंद्रावर 59 पैकी 58 मतदारांनी मतदान केल्याने तेथे 98.31 टक्के मतदानाची नोंद झाली.
मतदानासाठी नोंद असलेल्या 212 पुरुष आणि 254 महिला अशा एकूण 466 मतदारांपैकी 211 पुरुष व सर्व 254 महिला मतदारांनी मतदान केले. महिला मतदारांची मतदानाची टक्केवारी 100 टक्के राहिली, तर पुरुषांची मतदानाची टक्केवारी 99.53 टक्के नोंदविण्यात आली.
जिल्हा प्रशासनाने केलेल्या प्रभावी नियोजनामुळे मतदान प्रक्रिया कोणत्याही अडचणीशिवाय पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने मतदानात सहभाग घेत लोकशाही प्रक्रियेप्रती आपली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
मतदान केंद्रनिहाय मतदान टक्केवारी पुढील प्रमाणे आहे. परभणी – 100 टक्के, सेलू – 98.31 टक्के, गंगाखेड – 100 टक्के, पाथरी – 100 टक्के, हिंगोली – 100 टक्के, कळमनुरी – 100 टक्के, वसमत – 100 टक्के.
लोकशाहीप्रती जागरूकता आणि कर्तव्यभावनेचे दर्शन घडविणाऱ्या या मतदान प्रक्रियेत मतदारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आदर्श निर्माण केला.
********
No comments:
Post a Comment