12 June, 2026

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त स्वाक्षरी मोहीम व बाल कामगार शोध अभियान

 



हिंगोली (जिमाका), दि. 12 : जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष तसेच पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात जनजागृतीपर स्वाक्षरी मोहीम आणि बाल कामगार शोध अभियान राबविण्यात आले.

या मोहिमेची सुरुवात जिल्हाधिकारी कार्यालयातून करण्यात आली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. 


स्वाक्षरी मोहिमेनंतर शहरातील विविध भागांत बाल कामगार शोध मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत हॉटेल, वर्कशॉप, दुकाने तसेच इतर व्यावसायिक आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान संबंधित व्यावसायिकांना बालकामगार न ठेवण्याबाबत सूचना देण्यात आल्या. तसेच बालकामगार आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

या अभियानाचा मुख्य उद्देश बालकामगार प्रथा रोखणे, बालकांच्या शिक्षण व संरक्षणाच्या हक्कांचे जतन करणे तसेच बालकामगार प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा होता. बालकांना शिक्षण, संरक्षण आणि सुरक्षित बालपणाचा हक्क मिळावा यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

नागरिकांनी आपल्या परिसरात कोणतेही बालक काम करताना आढळल्यास तात्काळ चाईल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098, स्थानिक पोलीस ठाणे किंवा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

या मोहिमेत कामगार विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. बालकांचे शिक्षण, संरक्षण व सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी अशा जनजागृतीपर आणि तपासणी मोहिमा नियमितपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

******

No comments: