12 March, 2021

कळमनुरी तालुक्यातील शेवाळा व सांडस येथे कंटेनमेंट झोन घोषित

 


हिंगोली, (जिमाका) दि. 12 : कळमनुरी तालुक्यातील शेवाळा व सांडस गावात कोविड-19 चे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या रोगाचा फैलाव इतरत्र होऊ नये म्हणून शेवाळा, सांडस या गावाचे संपूर्ण क्षेत्र हे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. 

या परिसरातील नागरिकांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. या परिसरातील सर्व आवश्यक त्या सेवा या आदेशान्वये बंद करण्यात आल्या आहेत. नागरिकांना आवश्यक त्या सेवा   ग्रामपंचायत मार्फत वेळोवेळी आवश्यकतेनुसार देण्यात येणार आहेत.

            या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) चे कलम 188 व साथरोग कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.

****

08 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 34 रुग्ण ; तर 32 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज

 


·  359 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 08 : जिल्ह्यात 34 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे वसमत परिसर 05, वसमत परिसर 02 व्यक्ती, कळमनुरी परिसर 01 व्यक्ती, सेनगांव परिसर 01 व्यक्ती, औढा परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 20 व्यक्ती, औंढा परिसर 02 व्यक्ती, कळमनुरी परिसर 02 व्यक्ती असे एकूण 34 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 32 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 22 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 04 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 26 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 437 रुग्ण झाले असून, त्यापैकी  4 हजार 14 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 359 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 64 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

****

 

 

शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेच्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते शुभारंभ

 





हिंगोली,(जिमाका)दि.8: शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाची व सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती संबंधित लाभार्थ्यांना व्हावी यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाने तयार केलेल्या चित्ररथाचा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी शासनाच्या विविध कल्याणकारी योजनाची व समाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांवर आधारीत  माहिती पुस्तिका, घडीपत्रिका, भित्तिपत्रिका चे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगावकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगिरे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आणि माहिती सहाय्यक चंद्रकांत कारभारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

या चित्ररथावर योजना माझ्यासाठी सर्वांसाठी अंतर्गत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, माझी कन्या भाग्यश्री, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना, दुधाळ जनावरांचे गट वाटप, शालेय शिक्षण विभाग तर योजना सामाजिक न्यायाच्या अंतर्गत रमाई आवास (घरकुल) योजना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना, कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनासह कोरोना जनजागृतीची माहिती चित्ररथावर देण्यात आली आहे.

सोबतच सर्वसाधारण आणि समाज कल्याणच्या विविध योजनांचे ऑडिओ जिंगल्सद्वारे लाभार्थ्यांना विविध योजनांची माहिती देवून त्यांना संबंधीत योजनेचा लाभ घेण्यास मदत होणार आहे. हा चित्ररथ हिंगोली जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरणार असून अनेक लाभार्थ्यांना तसेच नागरिकांना याचा लाभ होणार आहे.

*****

  


05 March, 2021

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 46 रुग्ण ; तर 26 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 341 रुग्णांवर उपचार सुरु तर एकाचा मृत्यू

 


 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 05 : जिल्ह्यात 46 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसर 13, कळमनुरी परिसर 04 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती तर आरटीपीसीआरद्वारे हिंगोली परिसर 27 व्यक्ती, औंढा परिसर 01 व्यक्ती असे एकूण 46 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 26 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

             सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 20 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर 03 कोविड-19 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्यामुळे त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. अशाप्रकारे आज रोजी एकूण 23 रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 4 हजार 321 रुग्ण झाले असून, त्यापैकी  3 हजार 918 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 341 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 62 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

 

वयोवृध्दासाठी काम करणाऱ्या इच्छुक व्यक्ती व संस्थांनी 12 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, दि. 05 (जिमाका) : जिल्हयातील वयोवृध्दासांठी कार्य करणाऱ्या इच्छुक व्यक्ती व संस्थानी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयात दि. 12 मार्च, 2021 पर्यंत चार प्रतीत प्रस्ताव  सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांनी केले आहे.

दि. 1 ऑक्टोंबर 2021 रोजी जागतिक वयोवृध्द नागरिक दिन साजरा करण्यात येत आहे. या आंतरराष्ट्रीय वयोवृध्द दिनानिमित्त केंद्र शासनाकडून एकात्मिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वयोवृध्दांसाठी काम करणाऱ्या व्यक्ती , संस्थांना विविध प्रवर्गातील वयोश्रेष्ठ सन्मान पुरस्कार देण्यात येणार आहे.

अधिक  माहितीसाठी  शासनाचे ऑनलाईन संकेतस्थळावर https://socialjustice.nic.in आपले नामाकंन करण्यात यावे.

***** 

8 ते 26 मार्च या कालावधीत फिरते लोकन्यायालयाचे आयोजन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 05 : मा. उच्च न्यायालय विधी देखरेख उपसमिती औरंगाबाद यांच्या निर्देशानुसार परभणी न्यायिक जिल्ह्यामध्ये दिनांक 8 मार्च ते 26 मार्च , 2021 या कालावधीमध्ये फिरते लेाकन्यायालयाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्या अनुषंगाने दिनांक 8 मार्च रोजी सकाळी 11.00 वाजता फिरते लोकन्यायालय व शिबीरांच्या वाहनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम जिल्हा न्यायालय परिसर, परभणी येथे आयोजित करण्यात आलेला आहे.

दि. 8 मार्च, 2021 रोजी 5.30 वाजता वसमत तालुक्यातील पारडी खु., दि.9 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता वसमत तालुक्यातील पारडी बागल, सकाळी 10.30 वाजता वसमत तालुक्यातील गिरगांव, सायंकाळी 5.30 वाजता औंढा तालुक्यातील नागेशवाडी, दि.10 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता औंढा तालुक्यातील राजापूर, 10.30 वाजता औंढा तालुक्यातील पिंपळदरी येथे फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 12 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता कळमनुरी तालुक्यातील जांभरुन, सकाळी 10.30 वाजता कळमनुरी तालुक्यातील उमरा, सायंकाळी 5.30 वाजता हिंगोली तालुक्यातील सवड येथे फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

दिनांक 15 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता हिंगोली तालुक्यातील घोटा, 10.30 वाजता हिंगोली तालुक्यातील नरसी. दि.16 मार्च, 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता सेनगाव तालुक्यातील भंडारी, सकाळी 10.30 वाजता सेनगाव तालुक्यातील वटकळी येथे फिरते लोकन्यायालय व शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ . के. शेख यांनी दिली आहे. 

********

कोरोनाला रोखण्यासाठी जनतेनी काळजी घ्यावी --- विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर

 





हिंगोली, दि. 05 (जिमाका) : कोरोनाच्या प्रादुर्भावाची सुरुवात झाल्यापासून हिंगोली जिल्ह्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत खूप चांगले काम केले असून हिंगोलीकरांनी देखील प्रशासनास खूप सहकार्य केले. परंतु सध्या कोविड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनतेनी स्वत:ची व इतरांची काळजी घेण्याचे आवाहन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी आज येथे केले.

येथील जिल्हा सामान्य रुग्णालयास विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी धनवंत माळी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांची यावेळी उपस्थिती होती.

यावेळी विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली व व्हेंटीलेटरवर असलेल्या रुग्णांशी चर्चा करुन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांना योग्य प्रकारे आरोग्य सुविधा मिळत असल्याने समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी हिंगोली येथील सुशोभिकरण करण्यात आलेल्या रामलीला मैदानाची विभागीय आयुक्त केंद्रेकर यांनी भेट देऊन पहाणी केली. मैदानाचे सपाटीकरण, चोहोबाजूने वृक्ष लागवड व इतर कामकाज पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच येथील उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयास भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला.  

*****