19 November, 2025
स्वाधार योजनेसाठी 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करा
हिंगोली (जिमाका), दि.19 : शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधा अभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुजाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी 11 वी, 12 वी तसेच 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुलांमुलीप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
शैक्षणिक वर्ष 2025-26 चे अर्ज ऑनलाईन पद्धतीने https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर भरणे सुरू आहे. पात्र विद्यार्थ्यांनी दिनांक 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावेत. तसेच ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रांसह सहायक आयुक्त समाजकल्याण कार्यालयास सादर करावे.
अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्वाधार योजनेचा लाभ घेण्यासाठी आपला अर्ज ऑनलाईन पध्दतीने सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांनी केले आहे.
*******
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
हिंगोली(जिमाका), दि.19: भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्रीमती प्रगती चोंडेकर, नायब तहसीलदार संतोष बोथीकर, सचिन जोशी, डी. एस. जोशी यांच्यासह उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) श्री. माचेवाड यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.
******
18 November, 2025
'माय भारत केंद्र' युवकांसाठी दिशादर्शक - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
हिंगोली,(जिमाका)दि. 18 : जिल्ह्यातील 'माय भारत केंद्र' हे युवकांसाठी दिशादर्शक ठरणारे असून या संधीचा लाभ युवा वर्गाने घेऊन राष्ट्रीय स्वाभिमान व एकात्मता साधून आत्मनिर्भर भारत निर्माण करावा, असे उद्गार जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी काढले.
येथील माय भारत केंद्राच्या वतीने एकात्मता युनिटी मार्च पदयात्रेतून एकतेचा जयघोष, राष्ट्रीय अभिमान आणि स्वावलंबनाचा संदेश घेऊन येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून पदयात्रेचा प्रारंभ करताना जिल्हाधिकारी गुप्ता बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, माय भारत केंद्राचे आदर्श युवा पुरस्कार्थी पत्रकार डॉ.विजय निलावार, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश मारावार, समाजसेविका सुनीता मुळे मंचावर उपस्थित होते.
स्वागतपर प्रास्ताविकातून केंद्र प्रमुख अनिल ढेंगे यांनी योजनाबद्दल माहिती दिली. पदयात्रेची सुरुवात लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांनी केल्यानंतर राष्ट्रीय एकात्मतेची व आत्मनिर्भर भारतची शपथ जिल्हाधिकारी श्री. गुप्ता तर व्यसन मुक्तीची शपथ जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी उपस्थित युवक-युवतींना दिली.
ही पदयात्रा शिवाजीराव देशमुख सभागृहात पोहचली.त्यानंतर जिल्हाधिकारी गुप्ता, जिल्हा पोलीस अधीक्षक कोकाटे, डॉ. विजय निलावार, क्रीडा अधिकारी मारावार, राष्ट्रीय सेवा योजना जिल्हा प्रमुख प्रा.डॉ.पवन वासनिक, प्रा.किशोर इंगोले, प्रा.डॉ.सुधीर वाघ आदींच्या हस्तेसांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले.
राष्ट्रीय पातळीवर हिंगोली माय भारत केंद्राच्या माध्यमातून युवकांनी मजल मारली असून भविष्यातही हिंगोली जिल्ह्याचे नावलौकिक करावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी करून शुभेच्छा दिल्या. 1993 ला मला या केंद्राने आदर्श युवा पुरस्काराने सन्मानित केले. त्यानंतर राज्य आणि केंद्र शासनाच्या अनेक पुरस्काराचा मानकरी ठरलो तसे तुम्हा युवक-युवतींबाबत या उपक्रमातून व्हावे, अशा शुभेच्छा देऊन डॉ. निलावार यांनी अपेक्षा व्यक्त केल्या.
सांस्कृतिक कार्यक्रमात युवक युवती नि सांघिक व वैयक्तीक रंगदार उत्स्फूर्त कला प्रदर्शन केले. प्रथम पारितोषिक भारतीय विद्या मंदिरच्या ललाटी भंडारा, गोंधळ या नृत्याला, द्वितीय अनुसया विद्या मंदिरच्या अंबाबाई गोंधळाला यावे या उपक्रमाला, तिसरे पारितोषक तिसरे सरजुदेवी भिकुलाल भारूका विद्यालयातील लावणी नृत्याला, उत्तेजनार्थ कु.माही घुगे, हर्षदा कुगावकर याना स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व मेडल्स देऊन मंचावरील मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.
या सर्व उपक्रमात व कार्यक्रमात हिंगोली जिल्हा स्काऊट गाईडचे स्वयंसेवक व प्रमुख माधुरी दळवी, सरजुदेवी भारुका विद्यालयाचा एन.सी.सी.कॅडेट व विभाग प्रमुख, राष्ट्रीय सेवा योजना, आदर्श महाविद्यालय, न्यू मॉडर्न कॉलेज, खाकीबाबा इंग्लिश स्कूल, भारतीय विद्यामंदिर, अनुसया विद्या मंदिर, शिवाजी महाविद्यालय हिंगोलीचे राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी आणि समन्वयक, संडे ऑन मॉर्निंग सायकलिंग ग्रुप सह राष्ट्रप्रेमी नागरिक मेरा युवा भारत केंद्राचे प्रवीण पांडे, क्रीडा विभागाचे आत्माराम बोथीकर आदी सर्व निमंत्रित सहभागी झाल्याने कार्यक्रम यशस्वी झाल्याचे केंद्र प्रमुख अनिल ढेंगे यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन प्रा.डॉ.किशोर इंगोले यांनी केले. शेवटी सामूहिक वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
***
17 November, 2025
हिंगोली व वसमत नगर परिषद निवडणूक निरीक्षक म्हणून रत्नदीप गायकवाड यांची नियुक्ती
• राजकीय पक्ष, उमेदवार, नागरिक किंवा मतदाराची तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 17 : राज्य निवडणूक आयोगाने हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व वसमत नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नांदेडचे अपर जिल्हाधिकारी रत्नदीप गायकवाड यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्यांचा संपर्क क्रमांक 9702220024 हा आहे.
नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या निरीक्षणासाठी आलेले निवडणूक निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांना कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या स्वाक्षरीने आदेशित करण्यात आले आहे.
***
'नशामुक्त भारत अभियाना'त सर्वांनी सहभागी व्हावे - जिल्हधिकारी राहुल गुप्ता
* समारोपीय कार्यक्रमात विविध उपक्रमांचे आयोजन
हिंगोली, (जिमाका) दि. १७: केंद्र शासनाच्या निर्णयानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये उद्या मंगळवार, दि. १८ रोजी 'नशामुक्त भारत अभियानांचा समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांनी या अभियानात सहभागी होऊन यशस्वी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
दि. १ ऑगस्ट ते ६ नोव्हेंबर २०२५ दरम्यान 'नशामुक्त भारत अभियाना'अंतर्गत विविध जागरुकता उपक्रम राबवले गेले. या उपक्रमांमध्ये नशामुक्त भारत प्रतिज्ञा व लेखन, रांगोळी, चित्रकला, घोषवाक्य लेखन, रॅली, नुक्कड नाटक, चर्चासत्रे, कार्यशाळा, योगशाळा आणि नागरिक जागरूकता अभियानांचा समावेश होता.
या कार्यक्रमांचा समारोप उद्या मंगळवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी अमृतसर, पंजाब येथे होणार आहे. या ठिकाणी भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने नशामुक्त भारत अभियानाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त एक विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला हिंगोली जिल्ह्यातील सर्व शालेय, महाविद्यालयीन, आश्रमशाळा आणि अनुदानित विना अनुदानित वसतिगृहांमध्ये सकाळी ११ वाजता सामूहिक आणि वैयक्तिक नशामुक्त प्रतिज्ञा घेतली जाईल. यासोबतच सोशल मिडियावर #NMBA हॅशटॅगसह फोटो आणि व्हिडिओ पोस्ट करून, देशव्यापी नशामुक्त आंदोलनास जास्तीत जास्त पॅम्पलेट्स आणि जाहिरातांचे समर्थन दिले जाईल.
याव्यतिरिक्त, जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळा, सामाजिक संस्था, खाजगी आणि शासकीय वसतिगृहे, तसेच सरकारी कार्यालयांमध्ये 'नशामुक्त भारत अभियाना'च्या ई-प्रतिज्ञेसाठी एकत्रित अहवाल सादर करावा लागणार आहे. हा कार्यक्रम सोशल मीडियावर प्रसारित करणे, विविध माध्यमांद्वारे त्याची जाहिरात करणे आणि त्याचे राष्ट्रीय सूचना विभागामार्फत राष्ट्रीय स्तरावर रिपोर्टिंग करण्यात येणार आहे.
नशामुक्त भारत अभियानाने समाजातील प्रत्येक घटकाला एकत्रित करणे आणि एक मजबूत जागरुकता निर्माण करणे हे मुख्य उद्दिष्ट आहे. हा उपक्रम हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांच्या सहकार्याने यशस्वी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.
***
खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओवरील आक्षेपार्ह प्रसारणावर राहणार नियंत्रण
• जिल्हास्तरीय केबल टेलिव्हिजन नेटवर्क सनियंत्रण समितीची बैठक संपन्न
हिंगोली,(जिमाका)दि. 17 : खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन होणाऱ्या सामुग्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 नुसार जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची स्थापन करण्यात आली आहे. या समितीची बैठक आज दि. 17 नोव्हेंबर, 2025 रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली.
या बैठकीत खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व खाजगी वाहिन्यांनी केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 चे पालन करणे बंधनकारक असून, सदर कायद्यानुसार सर्व नोंदणीकृत खाजगी वाहिन्यांनी फ्रि टू एअर वाहिन्या आणि दूरदर्शन वाहिन्याचे प्रक्षेपण करणे बंधनकारक आहे. जाहिरात संहितेचे कार्यक्रमाच्या प्रसारणात उल्लंघन करणे, विविध धर्म, जाती, भाषा, वर्ग, समूह आणि समाजाच्या भावना दुखविणारे किंवा समाजात द्वेषभावना पसरविणारे प्रसारण करणाऱ्यांविरुद्ध चौकशी करून कारवाई करण्याचे अधिकार या समितीला असणार आहेत. अशा प्रसारणाची तक्रार आल्यास संबंधित केबल चालकाकडून कार्यक्रमाची दृश्ये मागविण्याचे अधिकार समितीला आहेत. ज्या नोंदणीकृत खाजगी वाहिन्या किंवा एफ. एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरून आक्षेपार्ह प्रक्षेपण करत असतील, अशा वाहिन्यांची किंवा रेडिओची तक्रार प्राप्त झाल्यास या कायद्यानुसार संबंधितावर योग्य ती कारवाई करण्यात यावी. तसेच अनिवार्य वाहिन्यांच्या प्रक्षेपणात व्यत्यय येणे, सिग्नल न मिळणे अशा त्रुटी आढळल्यास किंवा तक्रारी प्राप्त झाल्यास प्राधिकृत आधिकाऱ्यांनी संबंधित केबल ऑपरेटरला समज द्यावी. जिल्ह्यातील कार्यरत खासगी एफ. एम. रेडिओ आणि कम्युनिटी रेडिओ स्टेशन्सद्वारे हवाई प्रसारण संहितेचे पालन होते का नाही, यावर लक्ष व नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिल्या.
तक्रारींची शहानिशा करुन केबल चालक किंवा खासगी एफ. एम. रेडिओ विरुद्ध तात्काळ योग्य ती कारवाई करावी. जर एखाद्या कार्यक्रमाचा सार्वजनिक सुव्यवस्थेवर परिणाम होत असेल किंवा कोणत्याही समाजात असंतोष निर्माण होत असेल तर तात्काळ जिल्हाधिकारी तसेच राज्य व केंद्र शासनाच्या त्वरित नजरेस आणून द्यावे. तसेच जिल्ह्याकरिता तक्रार निवारण केंद्राची स्थापना करावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील करमणूक कर शाखेने स्थानिक वृत्त वाहिन्यांना केबल ऑपरेटर म्हणून नोंदणी देण्याऐवजी फक्त केबल ऑपरेटर किंवा केबल परिचालक म्हणूनच परवानगी द्यावी. टपाल विभागानेही याबाबतची नोंद घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिनी किंवा एफ. एम. रेडिओ केंद्र किंवा कम्युनिटी रेडिओ केंद्रावरुन आक्षेपार्ह संदेशाचे प्रसारण होत असल्यास संबधित वाहिन्यावर कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यातील शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थी व नागरिकांमध्ये केबल टेलिव्हिजन नेटवर्क (विनियमन) अधिनियम 1995 कायद्याबाबत विविध माध्यमातून व्यापक जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिल्या.
प्रारंभी जिल्हा माहिती अधिकारी तथा समितीचे सदस्य सचिव प्रभाकर बारहाते यांनी या खाजगी दूरचित्रवाणी सनियंत्रण समितीची रचना व तीची कार्ये तसेच खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवर आक्षेपार्ह कार्यक्रम व जाहिरात याविषयी दर्शकांकडून येत असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तसेच केबल वाहिन्या आणि केबल चालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभर कायदा लागू केला आहे. तसेच स्थानिक खाजगी दूरचित्रवाणी वाहिन्या आणि एफ. एम. रेडिओ केंद्रे तसेच कम्युनिटी रेडिओ केंद्राचे सनियंत्रण करण्याचे काम ही समिती करणार असल्याची माहिती यावेळी दिली.
या बैठकीस समितीचे सदस्य पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी इरफान पठाण, सरजूदेवी भिकुलाल आर्य कन्या महाविद्यालयाच्या प्राचार्या माधवी गुंडेकर, महिलासाठी काम करणाऱ्या उज्वल प्रसारक मंडळ या स्वयंसेवी संस्थेचे उज्वल पाईकराव, इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी गजानन देशमुख, समर्थ पत्रकारिता व जनसंवाद महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कोल्हे यांची यावेळी उपस्थिती होती.
*****
15 November, 2025
आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जाण्यासाठी मोबाईलचा सकारात्मक वापर करावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त हिंगोली येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन
हिंगोली (जिमाका), दि. 15 : भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकत आदिवासी विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जावे. यासाठी विद्यार्थ्यांनी मोबाईलचा सकारात्मक वापर करून अभ्यास व पुस्तके वाचण्यावर भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी याप्रसंगी केले. तसेच ‘आदि कर्मयोगी अभियान’अंतर्गत राज्य व देश पातळीवरील यशाबद्दल त्यांनी प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे तसेच या अभियानात योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
कळमुनरी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने हिंगोली येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आज भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन व दीपप्रज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी प्रकल्प अधिकारी डॉ. सुनिल बारसे, सहायक प्रशासन अधिकारी आर.एस. भडके, आर. एल. भोसले, डी.यु. भानापुरे, लेखा अधिकारी कपिल पर्रे, ओ. एस. फड (सं.स.), 'उगम'चे जयाजी पाईकराव, सिरळीच्या अनुदानित आश्रमशाळेचे अध्यक्ष श्री. देशमुख उपस्थित होते.
या कार्यक्रमात ‘आदि कर्मयोगी अभियान’मध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. यामध्ये जे.आर. सानप, विलास राठोड, स्वाती किर्तनकार, बालाजी काळे, अरविंद सुर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. तसेच भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल दिलीप महाजन यांचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी आदिवासी समाजातील शासकीय सेवेत नव्याने रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांचा आणि जिल्ह्यातील 10 वी व 12 वीमध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. अनुदानित आश्रमशाळा सिरळी येथील 35 आदिवासी विद्यार्थिनींनी फक्त 15 मिनिटांत भागवत कथा लिहिण्याचा विक्रम केला असून त्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली आहे. या सर्व 35 विद्यार्थिनींचा सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या समारोपात आपल्या भाषणातून डी. यु. भानापुरे यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिलेल्या विद्यार्थी, पालक, अधिकारी-कर्मचारी तसेच कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतलेल्या सर्वांचे आभार मानले.
**
Subscribe to:
Posts (Atom)







