15 November, 2025
जिल्हास्तरीय युवा महोत्सवाला युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
• विजेत्या स्पर्धकांचा रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव
हिंगोली (जिमाका), दि. 15 : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने येथील कै.शिवाजीराव देशमुख सभागृहात दि. 14 नोव्हेंबर रोजी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या महोत्सवाचे उद्घाटन डॉ. विजय निलावार यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करुन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त एम. एम. राऊत, प्रा. डॉ. सुधीर वाघ, प्रा.आनंद गायकवाड, जिल्हा क्रीडा पुरस्कार्थी शिवाजी इंगोले, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, जिल्हा क्रीडा अधिकारी आर. एस. मारावार आदी उपस्थित होते.
युवक व युवतींचा राष्ट्रीय जडणघडणात महत्त्वाचा वाटा असून, युवक व युवतीने युवा महोत्सवाच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्याचा नावलौकीक कमवावा, असे आवाहन डॉ. निलावार यांनी उद्घाटन प्रसंगी केले. याप्रसंगी बोलताना सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी यांनी क्रीडा व युवक संचालनालयाच्या वतीने आयोजित युवा महोत्सवामुळे युवांना आपल्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी संधी प्राप्त झाली आहे. युवक-युवतींनी कार्यक्रमाच्या माध्यमातून कलागुणांचे चांगले प्रदर्शन करावे, असे सांगून युवा महोत्सवात सहभागी युवक-युवतीला शुभेच्छा दिल्या.
प्रास्ताविकात जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार यांनी युवकांचा सर्वांगीण विकास व्हावा, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना वाव देणे, त्यांना एक खुले व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दिली.
जिल्हास्तरीय युवा महोत्सवामध्ये युवकांसाठी समूह लोकनृत्य, समूह लोकगीत, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, कविता लेखन, कथा लेखन व विज्ञान प्रदर्शन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत हिंगोली जिल्ह्यातील युवक व युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. यामध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या विजयी स्पर्धकांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रेही वितरीत करण्यात आली. या महोत्सवात प्रथम आलेल्या समुहाचे, वैयक्तीक कलाकारांना बीड येथे संपन्न होणाऱ्या विभागस्तरीय युवा महोत्सवमध्ये हिंगोली जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करणार आहेत.
या जिल्हास्तरीय युवा महोत्सवासाठी परीक्षक म्हणून समूह लोकनृत्य या कलाप्रकारात प्रा. राजु लोखंडे, कु. वैष्णवी लोंढे, प्रा. दिगाबंर घुगे, समूह लोकगीत या कलाप्रकारात प्रा. दिगांबर घुगे, मनिषा डहाळे, प्रथमेश कुलकर्णी, वक्तृत्व स्पर्धेत डॉ. प्रा. सुधीर वाघ, प्रा. राम तोडकर, प्रा. राजकुमार मोरगे, कथा लेखन या प्रकारात प्रा. सुरेश वराड, प्रा.राम तोडकर, प्रा. सुधीर वाघ, चित्रकला स्पर्धेमध्ये प्रा. एस. टी. तर्कसे, प्रा. अनिल गाढे, प्रा. प्रशांत चाटसे, विज्ञान व प्रदर्शन स्पर्धेमध्ये प्रा. आनंद गायकवाड, प्रा. धनजंय कुलकर्णी, प्रा. डॉ. पवन वासनिक तर कविता लेखन स्पर्धेमध्ये सर्वांनी काम पाहिले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सिंधुताई दहीफळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन क्रीडाधिकारी प्रविण कोंडेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात झाले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा महोत्सव प्रमुख तथा क्रीडाधिकारी आत्माराम बोथीकर, क्रीडाधिकारी प्रविण कोंडेकर, क्रीडाधिकारी गणेश बोडके, युवा पुरस्कार्थी प्रविण पांडे, विजय गव्हाणे, रवी हनवते आदींनी सहकार्य केले.
***
पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदीच्या कार्यवाहीचा सुधारित कार्यक्रम जाहीर
हिंगोली (जिमाका), दि.15 : पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणीच्या अर्जावर कार्यवाही करण्यासाठीचा सुधारित कार्यक्रम औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जाहीर केला आहे.
सुधारित कार्यक्रम हस्तलिखीते तयार करणे व प्रारुप मतदार याद्यांची छपाई 28 नोव्हेंबर, प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी 03 डिसेंबर, दावे व हरकती स्वीकारण्याचा कालावधी 03 ते 18 डिसेंबर, 2025, दावे व हरकती निकाली काढण्याचा दिनांक व पुरवणी यादी तयार करणे व छपाई करणे 05 जानेवारी, 2026, मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 12 जानेवारी, 2026 असा आहे.
***
जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांची जयंती साजरी
हिंगोली (जिमाका), दि. 15 : क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस जिल्हाधिकारी कार्यालयात पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
***
14 November, 2025
जुनुना प्रकरणावर अनुसूचित जाती आयोगाची गंभीर दखल • समित्यांनी लवकरात लवकर अहवाल सादर करण्याचे निर्देश
हिंगोली (जिमाका), दि. 14: अनुसूचित जाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मपाल मेश्राम यांनी वसमत तालुक्यातील जुनुना येथे भेट देऊन प्रकरणाचा सखोल आढावा घेत प्रशासनाला लवकरात लवकर संपूर्ण अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. याबाबत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व समाज कल्याण विभाग यांच्यात समन्वयाने वेगाने कार्यवाही करण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले.
यावेळी अनुसूचित जमाती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. धर्मपाल मेश्राम, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, तहसीलदार शारदा दळवी, समाज कल्याण विभागाच्या सहायक आयुक्त गीता गुट्टे यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणातील सर्व बाबींची तपशीलवार चौकशी करून निश्चित कालावधीत अहवाल आयोगाला सादर करण्याची जबाबदारी समितीला देण्यात आली आहे.
उच्चस्तरीय अधिकारी (आयपीएस) अपर पोलीस अधीक्षक योगेशकुमार मीना यांना काही वर्षापूर्वी झालेल्या खून प्रकरणाच्या सुरुवातीपासून तपासाची पावले, पुरावे, नोंदी, साक्षीदारांचे जबाब आणि संपूर्ण तपासाचा प्रवास यांचा सविस्तर अहवाल आयोगाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.
सद्यस्थितीत जुनुना गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, पोलीस उपअधीक्षक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी आणि गावातील प्रत्येक समाजाचा एक प्रतिनिधी सहभागी करून ग्रामपातळीवरील शांतता समिती तातडीने स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या समितीने दर पंधरा दिवसाला आढावा बैठक घेऊन गावातील सामाजिक सलोखा टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावेत, अशी सूचना आयोगाने केली.
यासोबतच एकसदस्यीय चौकशी समिती, पोलीस विभागाचा सविस्तर तपास अहवाल आणि ग्रामस्तरीय शांतता समित्यांच्या अहवालासह सर्व तीन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच आयोग अंतिम निर्णय देणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
जुनुना प्रकरणातील सत्यस्थिती प्रकाशात येण्यासाठी प्रशासन आता अधिक सज्ज असून, आयोगाने दिलेल्या निर्देशांनुसार कार्यवाहीला गती मिळाली आहे.
******
माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार डी. एस. जोशी, सचिन जोशी, संतोष बोथीकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
13 November, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी हिंगोली शहरातील मतदान केंद्राची केली पाहणी
हिंगोली (जिमाका), दि. 13 : राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी आणि वसमत नगर परिषदेची निवडणूक जाहीर केली आहे. या निवडणुकीसाठी दि. 2 डिसेंबर, 2025 रोजी मतदान होणार आहे.
त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज हिंगोली शहरातील अण्णाभाऊ साठे वाचनालय, इकबाल उर्दू स्कूल पेन्शनपुरा, गोपीनाथ मुंडे शेतकरी भवन, भारती विद्यामंदीर, नगर परिषद शाळा, आजम कॉलनी येथील इकबाल इंटरनॅशनल स्कूल, माहेश्वरी भवन येथील मतदान केंद्राना भेटी देऊन मतदानाच्या दिवशी केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या मूलभूत सोयीसुविधांची पाहणी केली. तसेच आवश्यक त्या सूचना केल्या.
यावेळी मुख्याधिकारी अरविंद मुंढे यांच्यासह विविध अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
*****
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांची कोंढूर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट
• विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे केले परीक्षण, शैक्षणिक कार्याबद्दल केले समाधान व्यक्त
हिंगोली(जिमाका), दि. 13: जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज कळमनुरी तालुक्यातील कोंढूर येथील जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन शाळेतील शैक्षणिक व भौतिक सुविधांचा आढावा घेतला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश पतंगे आणि शिक्षक राजू सावंत, निखीलकुमार नवले उपस्थित होते.
जिल्हाधिकारी गुप्ता यांनी शाळेचा परिसर, वर्गखोल्या, शैक्षणिक साधनसामग्री, राबविण्यात येणारे उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची पाहणी केली. त्यांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता तपासली आणि गणित व इंग्रजी विषयावर विशेष भर देण्याचे शिक्षकांना सुचविले.
6 वी व 7 वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा आत्मविश्वास वाढविला आणि नियमित अध्ययनाचे महत्त्व पटवून दिले.
एकूणच शाळेचे वातावरण, शिक्षकांचा सहभाग आणि विद्यार्थ्यांची गुणवत्ता पाहून जिल्हाधिकारी गुप्ता यांनी समाधान व्यक्त केले.
*****
Subscribe to:
Posts (Atom)











