07 January, 2026

महा-निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026 अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे सोमवारी आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 07 : राज्याच्या आर्थिक विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) क्षेत्रावर अधिक भर देऊन त्यांची कार्यक्षमता व उत्पादकता वाढविणे, राज्यात उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात निर्माण करणे, एक जिल्हा एक उत्पादन उपक्रम तसेच निर्यातवृद्धीस चालना देण्याच्या उद्देशाने राज्य व केंद्र शासनाच्या विविध विभागांमार्फत अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येत आहेत. या सर्व योजनांची माहिती उद्योजकांना एकाच व्यासपीठावर उपलब्ध व्हावी, या दृष्टीने संबंधित सर्व विभागांच्या सहकार्याने महा-निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026 अंतर्गत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा सोमवार, दि. 12 जानेवारी 2026 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेसाठी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग घटक, निर्यातदार, निर्यातक्षम उद्योजक, नवउद्योजक, औद्योगिक संस्था व संघटना, औद्योगिक समूह, औद्योगिक वसाहती, शेतकरी सहकारी संस्था व उत्पादक, प्रक्रिया उद्योग केंद्रे, तसेच राज्य शासन व संबंधित उपक्रमांचे अधिकारी, जिल्हा निर्यात प्रचालन समितीचे सदस्य, निर्यातविषयक कामकाज करणारे घटक, संशोधक व बँक प्रतिनिधी यांना आमंत्रित करण्यात आले आहे. कार्यशाळेत नागपूर येथील डीजीएफटीचे महासंचालक, अपेडा पुणे, एमएसएमईचे सहाय्यक संचालक, आत्माचे प्रकल्प संचालक, मैत्री कक्षाचे अधिकारी, इंडियन पोस्टचे अधिकारी, अधीक्षक कृषी अधिकारी आदी तज्ज्ञांकडून निर्यात, उद्योगविकास व शासकीय योजनांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. वरील सर्व संबंधित घटकांनी दि. 12 जानेवारी 2026 रोजी आयोजित या एकदिवसीय कार्यशाळेस वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. *****

No comments: