03 May, 2019

शहीद जवान संतोष चव्हाण यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप · शासकीय इतमामात शहिद संतोष चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार












शहीद जवान संतोष चव्हाण यांना साश्रूनयनांनी अखेरचा निरोप
·   शासकीय इतमामात शहिद संतोष चव्हाण यांच्यावर अंत्यसंस्कार

हिंगोली,दि.03: अमर रहे... अमर रहे... शहीद जवान संतोष चव्हाण अमर रहे..., भारत माता की जय..., वंदे मातरम... या देशभक्ती उत्तेजित करणाऱ्या घोषणांनी मौजे ब्राम्हणवाडाचे आसमंत निनादून गेले. महाराष्ट्र दिनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालूक्यातील दादापूर येथे नक्षल्यानी केलेल्या भ्याड हल्ल्यात औंढा नागनाथ तालूक्यातील मौजे ब्राम्हणवाडा येथील सी-60 कमांडो जवान संतोष चव्हाण यांना वीरमरण आले. त्यांच्या पार्थिवावर आज त्यांच्या मूळ गावी मौजे ब्राम्हणवाडा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मौजे ब्राम्हणवाडा येथील त्यांच्या शेतात शहीद जवान संतोष चव्हाण यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी  शहीद जवान संतोष चव्हाण यांच्या तीन वर्षीय सुपूत्र तेजस याने मुखाग्नी दिला. यावेळी शहिद जवान संतोष चव्हाण यांच्या पत्नी अश्वीनी चव्हाण, लहान तीन महिन्याचा मुलगा योगेश चव्हाण, वडील देवीदास चव्हाण, आई भागूबाई चव्हाण, बहिण उषाबाई पवार, वंदनाबाई जाधव, नंदाबाई राठोड, रंजनाबाई राठोड आणि सिंधूताई राठोड यांच्यासह परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते. यावेळी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी साश्रु नयनांनी शहिद संतोष चव्हाण यांना अखेरचा निरोप दिला. यावेळी आमदार संतोष टारफे, तान्हाजी मुटकुळे, रामराव वडकुते, नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल, जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक आर. बी. जाधव, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यशवंत काळे, उपविभागीय अधिकारी प्रविण फूलारी, तहसीलदार अनिल माचेवाड यांनी शहिद संतोष चव्हाण यांना पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वा‍हिली. यावेळी सर्व मान्यवरांनी शहीद जवान संतोष चव्हाण यांच्या कुटूंबियांचे सांत्वन केले.
सुरूवातीस शहीद जवान संतोष चव्हाण यांचे पार्थिव औंढा नागनाथ शहरात आले असता, अनेक नागरिकांनी अमर रहे… च्या घोषणा देत पूष्प अर्पण करुन श्रद्धांजली वाहिली.
यावेळी अंतिम संस्काराला लोकप्रतिनिधी, पोलीस दलाचे अधिकारी-कर्मचारी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 
****



No comments: