09 May, 2019

शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापूस बियाणे खरेदी करु नये


शेतकऱ्यांनी एच.टी.बी.टी. कापूस बियाणे खरेदी करु नये
हिंगोली, दि.9: खरीप हंगाम 2019 मध्ये एच.टी. बी.टी. कापूस बियाण्याचा प्रसार होऊ नये या करीता कृषि विभागाकडून व्यापक मोहीम  हाती घेण्यात आलेली आहे. अवैध व पर्यावरण  विरोधी एच.टी. (हर्बीसाईड टॉलरन्स) कापूस  बियाणे असलेल्या ठिकाणची माहिती मिळताच तात्काळ कृषि  विभागातील  अधिकाऱ्यांशी  व पोलीस अधिकाऱ्यांशी  संपर्क साधावा. सन 2017 च्या खरीप हंगामात यवतमाळसह  राज्यात मोठ्या प्रमाणावर  कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. तसेच शेतकरी व शेतमजुरांना किटकनाशक फवारणी दरम्यान विषबाधा  झाली होती. त्या दरम्यान शेतकरी व शेतमजूरांचा मृत्यू झाला होता. त्यामागील कारणांचा वेध घेते वेळी बी.टी. बियाणे  ऐवजी एच.टी. बी.टी. कापूस बियाण्याची अवैधरित्या मोठ्या क्षेत्रावर लागवड झाल्याची  बाब समोर आली होती. परभणी जिल्ह्यात माहे फेब्रुवारी 2019 मध्ये अवैध एच.टी. बी.टी. कापूस बियाणे  साठा कृषि  विभागामार्फत  जप्त केला  असून याबाबत  संबंधितांवर पोलीसात  गुन्हा दाखल  झाला आहे. त्यामुळे  या हंगामात एच.टी. बियाणे अवैधरित्या  शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही याकरिता  विभागीय कृषि सहसंचालक, लातूर विभाग  यांच्या निर्देशानुसार कृषि विभागाने  जिल्हास्तरावर 01 व तालुका स्तरावर 05असे एकूण 6 भरारी पथकाची स्थापना केलेली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक कृषि निविष्ठा विक्री केंद्रात भरारी पथकाचे फोन नंबर देण्यात आलेले आहेत. जिल्ह्यात कोठेही एच.टी. बी.टी.  कापूस बियाण्यांची विक्री  साठवणुक व वितरण  होत असल्याचे आढळल्यास संबंधितांवर  बियाणे कायदा 1966 बियाणे नियम 1968 बियाणे नियंत्रण आदेश 1983 तसेच महाराष्ट्र कापूस बियाणे (वितरण  पुरवठा व विक्रीच्या किंमतीचे निश्चितीकरण यांचे विनियमन ) अधिनियम 2009 व नियम 2010  नुसार कायदेशीर कारवाई  करण्यात येईल,
शेतकऱ्यांनी अवैध  व पर्यावरण  विरोधी एच.टी. बी.टी. बियाणे खरेदी करु नये व लागवड करु नये जर एच.टी.बी.टी.  बियाण्याची विक्री, साठवणुक, बुकींग बाबत माहिती प्राप्त झाल्यास अथवा आढळून आल्यास तात्काळ कृषि विभागातील अधिकाऱ्यांशी, पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच भरारी पथकातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी मान्यता प्राप्त बियाणे अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावीत असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी व्ही. डी. लोखंडे, कृषि विकास अधिकारी ए.आर. डुबल यांनी केले आहे.
****


No comments: