30 May, 2019


प्रशासकीय यंत्रणांनी  प्रत्यक्ष गावांना भेट देवून टंचाईग्रस्त परिस्थितींची माहिती घ्यावी
                                                             - विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर


            हिंगोली,दि.30: जिल्ह्यातील ज्या गावांना पाणीटंचाई भासत आहे त्या गावांच्या पाणी पुरवठा करणा-या साठ्यांची संबंधीत प्रशासकीय यंत्रणांनी  प्रत्यक्ष टंचाईग्रस्त गावांना भेट देवून तेथील परिस्थितींची माहिती घ्यावी व टंचाईवर कायमस्वरुपी उपाययोजना सुचवाव्यात. तसेच टंचाई परिस्थितीत सर्व यंत्रणांनी संवेदनशीलरित्या कामे करावी अशा सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या.
            जिल्हाधिकारी कार्यालयातील डी.पी.सी. सभागृहात आयोजित टंचाईसदृश परिस्थिती व इतर योजनांचा आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,   जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी डॉ. एच.पी तुम्मोड, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पी. व्ही. बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, विभागीय वनअधिकारी केशव वाबळे,  जिल्हा प्रशासन अधिकारी चंद्रकांत सोनवणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. घुबडे,  सर्व तहसिलदार, सर्व गट विकास अधिकारी यांच्यासह सर्व संबंधीत यंत्रणेचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
हिंगोली जिल्ह्यात उद्भवलेली पाणी टंचाई आणि त्यावर प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा श्री. केंद्रेकर यांनी यावेळी घेतला. टंचाई निवारणासाठी सुरु असलेले टँकर, विंधन विहीर अधिग्रहण, पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती आदी कामांची माहिती विभागीय आयुक्त सुनील केंद्रकर यांनी संबंधीत यंत्रणेकडून घेतली.
 जिल्ह्यातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रशासनाने प्राधान्य द्यावे. संबंधीत अधिका-यांनी प्रत्यक्ष गावांना भेटी देऊन येथील परिस्थितीची माहिती घ्यावी व त्याचप्रमाणे ज्या गावांत पाणी टंचाई आहे तेथे भूवैज्ञानिकांचा सल्ला घेवून  दिर्घकालीन उपाय योजावेत अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.  
तालुक्यातील तहसिलदार, गट विकास अधिकारी, भूवैज्ञानिक अधिकारी व जलसिंचन विभागाच्या उप कार्यकारी अभियंता यांची एक समिती तयार करुन त्यांनी पाणीपुरवठा वसुली बरोबरच तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांचा मे महिण्यातील स्थितींचा विचार करुन पाणी उपलब्धतेचे नियोजन करावे अशी सुचना देतांना  टंचाईच्या काळात लोकहिताची कामे करण्याची संधी प्रशासनाकडे आहे. या संकटाला संधी मानून सर्व यंत्रणानी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी ते म्हणाले.  
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांचा समावेश करुन मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता करावी. तसेच गावातील पाणीपुरवठा संदर्भात नवीन योजना सुचवितांना जुन्या पाणीपुरवठा योजनेचा योग्य अभ्यास करुनच नवीन योजनांचा आराखडा तयार करावा. व नागरीकांमध्ये पाणी बचतीबाबत जनजागृती करतांना जलपुर्नभरणाचे फायदे स्पष्ट करावेत व प्रत्येकांना आपल्या घरातील बोअरचे जलपुर्नभरण करण्यास सांगावे, असेही  यावेळी श्री. केंद्रेकर यांनी सांगितले.
टंचाई सदृश परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील नागरिक हे कामाच्या शोधात इतरत्र स्थलांतरीत होत आहेत अशा नागरिकांसाठी  रोहयो योजने अंतर्गत कामे उपलब्ध करुन द्यावीत तसेच गाव तलाव, पाझर तलाव, साठवन तलाव, कोल्हापूरी बंधारे आदींची दुरुस्ती आदी कामांचा समावेश असावा.  रोहयो योजनेच्या कामांच्या ठिकाणी अधिका-यांनी स्वत: भेटी द्याव्यात,  असेही विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर म्हणाले.
सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यांचे कामे चांगल्या प्रकारे करुन रस्त्यांच्या दुतर्फाला झाडे लावावीत तसेच  कृषि विभागांने खरीप हंगामात पेरणी करण्यासाठी शेतक-यांची बियाणे व रासायनिक खते खरेदी करण्याची लगबग सुरु असते, या कालावधीत शेतकऱ्यांना बी बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देवून त्याबरोबरच जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवण्याच्या सुचना यावेळी त्यांनी दिल्या.                                ****

No comments: