मतमोजणीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज
हिंगोली,दि.22: हिंगोली लोकसभा मतदारसंघातील
निवडणुकीची मतमोजणी गुरुवार दि. 23 मे रोजी लिंबाळा एमआयडीसी परिसरातील शासकीय
तंत्रनिकेतन महाविद्यालय येथील इमारतीमध्ये होणार आहे. सकाळी 7 वाजता उमेदवार तसेच
उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर सुरक्षित कक्ष (स्ट्राँग रुम) उघडण्यात येणार असून
प्रत्यक्ष मतमोजणीला 8 वाजता सुरूवात होणार आहे. सकाळी 8.00 वाजता सर्व ई.व्ही.एम.
मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार असून, प्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार
आहे. यात एकूण 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामध्ये
मतदारसंघ क्रमांक (कंसात फेऱ्यांची संख्या) 82-(25), 83-(24), 84-(27), 92-(27),
93-(25), 94-(25) याप्रमाणे मतमोजणी प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे जिल्हा
प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या मतमोजणीसाठी
आयोगाने दोन निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती केली असून विधानसभा मतदारसंघ क्रमांक
82-उमरखेड, 83-किनवट, 84-हदगांव या मतदारसंघासाठी डॉ. जे. रवीशंकर यांची तर
विधानसभा मतदारसंघ क्रमांक 92-वसमत, 93-कळमनुरी, 94-हिंगोली या मतदारसंघासाठी उमेशकुमारअग्रवाल
यांची निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या मतमोजणी प्रक्रियेत 98
मतमोजणी सहायक, 98 मतमोजणी पर्यवेक्षक, 110 सुक्ष्म निरीक्षक यांची नियुक्ती
करण्यात आली असून प्रत्येक मतदारसंघासाठी 14 टेबलवर 27 फेऱ्यांमध्ये मतमोजणी
प्रक्रिया करण्यात येणार आहे. ईव्हीएमच्या मतमोजणीनंतर मा. भारत निवडणूक आयोगाने
दिलेल्या निर्देशानुसार व्हीव्हीपॅट मधील मतपत्रिकांची मोजणी करण्यात येणार आहे.
यावर्षी 5 हजार 812 टपाली मतपत्रिका
प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 768 सैनिकांच्या मतपत्रिका असून उर्वरीत मतदान
अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मतपत्रिकांचा समावेश आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी
पोलीस अधिक्षक योगेशकुमार यांच्या अधिपत्याखाली एक अप्पर पोलीस अधिक्षक, तीन पोलीस
उपअधिक्षक असे एकूण सुमारे 500 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात
आली असल्याचेही जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.
*****
No comments:
Post a Comment