06 August, 2018


मराठा समाजाने निदर्शने व ठिय्या आंदोलने मागे घ्यावीत
                                                                                                         -- डॉ. पुरुषोत्तम भापकर
                  
              हिंगोली,दि.6: मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरीता मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठवाडा विभागात विविध ठिकाणी आंदोलने, निदर्शने तसेच ठिय्या आंदोलने सुरु असून सदर निदर्शने तसेच ठिय्या आंदोलने मागे घ्यावीत असे शासनाच्या वतीने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी विनंती केली आहे.
            मराठा समाजाला आरक्षण देणे बाबत रविवार दि. 5 ऑगस्ट रोजी मा. मुख्यमंत्री यांनी राज्यातील जनतेशी दूरदर्शनच्या ‘सह्याद्री’ वाहिनी तसेच इतर वृत्त वाहिन्यावरुन संवाद साधला आहे. सदर संवाद हा महाराष्ट्र शासनाच्या ‘महान्यूज’ या संकेतस्थळावर उपलब्ध असून यात मराठा समाजाच्या विविध मागण्या मान्यतेच्या अनुषंगाने शासानाची भूमिका सविस्तररित्या स्पष्ट करण्यात आली असल्याचे विभागीय आयुक्त यांनी कळविले आहे.  
*****

अनुसूचित जाती व नवबौध्दासाठी अनुदान व बीज भांडवल योजना


अनुसूचित जाती व नवबौध्दासाठी अनुदान व बीज भांडवल योजना 

हिंगोली,दि.6:अनुसूचित जाती व नवबौध्द लोकांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने सन 2018-19 या आर्थिक वर्षामध्ये महामंडळाच्या राज्य शासन पुरस्कृत 50 टक्के अनुदान योजना व बीज भांडवल योजनांचा लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या अर्जदारांना दिनांक 11 जुलै, 2018 पासून महामंडळाच्या  www.mahatmaphulecorporation.com/applications या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज मागणी अर्ज उपलब्ध करुन देण्यात आलेले आहेत.
सदर योजने अंतर्गत इच्छुक अर्जदारांना महामंडळाकडून कर्ज घेण्याकरिता अर्जदारांनी त्यांचे स्वत:चे ई-मेल अकाऊंट वापरुन ऑनलाईन पध्दतीने कर्ज मिळण्याकरिता कर्ज मागणीचा अर्ज करावा. तसेच ऑनलाईन अर्ज केलेल्या अर्जदारांनी मागणी अर्जाची मूळ प्रत व आवश्यक त्या कागदपत्रांच्या साक्षांकित / स्वयंसाक्षांकित प्रती जिल्हा कार्यालयात स्वत: सादर करावीत. त्रयस्थ व्यक्तीकडून अर्ज किंवा इतर कोणतेही कागदपत्र स्विकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी, असे जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्यादित), हिंगोली यांनी कळविले आहे.
*****

04 August, 2018

‘गोवर रुबेला लसीकरण अभियान-2018’ 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील एकही मुल वंचित राहु नये -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी



‘गोवर रुबेला लसीकरण अभियान-2018’ 
9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील एकही मुल वंचित राहु नये
                                    -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
      हिंगोली,दि.4 : जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या गोवर रुबेला लसीकरण अभियानात प्रसार माध्यमांची भूमिका अत्यंत महत्वाची असून या अभियानाचा योग्य प्रचार व प्रसार करून सदर अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्याची सूचना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केली.
            येथील जिल्हा नियोजन सभागृहातील आयोजित जिल्हा दक्षता समिती बैठकीत जिल्हाधिकारी अनिल भंडारी बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड, उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. सय्यद मुजीब शिक्षणाधिकारी श्री. इंगोले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. व बा.) गणेश वाघ, समाज कल्याण अधिकारी श्रीमती गीता गुट्टे, यांच्यासह तालुक्यातील तहसिलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागाचे विभागप्रमुख यांची उपस्थिती होती.
            जिल्हाधिकारी श्री. भंडारी पुढे म्हणाले की, गोवर रुबेला लसीकरण अभियान 2018 येत्या नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात सुरू होत असल्यामुळे जिल्ह्यात 100 टक्के यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभाग व इतर विविध विभागांनी परस्पर समन्वय साधावा. तसेच येणाऱ्या विविध सण उत्सवाच्या उपक्रमात, जिल्ह्यात होणाऱ्या दसरा महोत्सवात या अभियानाची प्रचार व प्रसिध्दी करून जिल्ह्यातील 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील एकही बालक गोवर रुबेला लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.
            हिंगोली जिल्हा मानव विकास निर्देशांकानुसार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत फार पिछाडीवर असून सदर निर्देशांक वाढवण्यासाठी आरोग्य, शिक्षण आणि दरडोई उत्पन्न वाढवण्यासाठी सर्व विभागाने एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहनही यावेळी त्यांनी केले. 
यावेळी आपल्या मार्गदर्शनात जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. सय्यद मुजीब यांनी गोवर रुबेला या रोगाची सखोल माहिती देतांना सांगितले की, गोवर हा रोग अत्यंत घातक असून हा रोग विषाणूपासून नाक, तोंडाव्दारे होतो. या रोगामुळे जगातील होणाऱ्या मृत्युपैकी 36 टक्के मृत्यु भारतात होतात. तर रुबेला हा रोग सुध्दा विषाणूजन्य असून तो स्त्रियांच्या गरोदरपणात उद्भवल्यास अत्यंत घातक असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यासाठी गोवर रुबेला या रोगाची लस घेऊन सन 2020 पर्यंत पोलिओप्रमाणे या रोगाचे देशातून समुळ नष्ट करण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
बैठकीच्या प्रास्ताविकेत जिल्हा आरोग्य अधिकारी शिवाजी पवार यांनी सदरील कार्यशाळेत पॉवर पॉईंट प्रेझेंटशनव्दारे सादरीकरण केले, तर सूत्रसंचालन जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी सतीश रुणवाल यांनी केले.
सदरील मोहिम यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. व बा.) गणेश वाघ, शिक्षणाधिकारी श्री. इंगोले, धर्मगुरू सालासार मौलवी, आयएमएचे अध्यक्ष श्री. देशमुख, डॉ. नगरे, निमाचे श्री. मुलगीर, प्रसार माध्यमचे प्रतिनिधी श्री. पाटील यांनी गोवर रुबेला लसीकरण अभियान यशस्वी करण्यासाठी अभिवचन घेतले.
*****

03 August, 2018


जिल्हाधिकारी कार्यालयात क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस अभिवादन
हिंगोली, दि.3 : क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, तहसिलदार श्रीमती प्रतिभा गोरे, गजानन शिंदे, नायब तहसिलदार श्री. मिटकरी आदिंसह‍ प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
                                                           ***** 

माजी सैनिक/पत्नी/पाल्य विशेष गौरव पुरस्कार योजना करीता अर्ज करण्याचे आवाहन


माजी सैनिक/पत्नी/पाल्य विशेष गौरव पुरस्कार योजना करीता अर्ज करण्याचे आवाहन

      हिंगोली,दि.3 : विविध क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या जिल्ह्यातील माजी सैनिक/पत्नी/पाल्यांचा सैनिक कल्याण विभागामार्फत विशेष गौरव पुरस्कार योजना अंतर्गत पुरस्कार प्रदान केले जातात. याकरीता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या खेळात, साहित्य, संगीत, गाय, वादन, नृत्य, नाट्य व इतर कला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी, यशस्वी उद्योजक, सामाजिक कार्य आणि पर्यावरण विषयक पुरस्कार मिळविणारे इत्यादी माजी सैनिक, पत्नी, पाल्य तसेच सन 2017-18 शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी आणि 12 वी  बोर्डात 95 टक्के पेक्षा अधिक गुण मिळविलेल्या तसेच पदवी किंवा पदव्युत्तर परीक्षेत विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण व आयआयटी, आयआयएम व एम्स अशा नामवंत व ख्यातीप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या जिल्ह्यातील माजी सैनिक पाल्यांना सैनिक कल्याण विभागाकडून विशेष गौरव पुरस्कारप्रदान करण्यात येणार आहेत.
        या विशेष गौरव पुरस्कार योजनेसाठी पात्र जिल्ह्यातील माजी सैनिक, पत्नी पाल्यांनी या कार्यालयात उपलब्ध असलेले कागदपत्रांसाठी 16 सप्टेंबर, 2018 पूर्वी या कार्यालयात संपर्क साधावा. अर्जासोबत ओळखपत्राची छायांकित प्रत, 10 व 12 वी बोर्डाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत, चालू वर्षी शिकत असल्याचे बोनाफाईड सर्टीफिकेट, डिस्चार्ज पुस्तकात कुटुंबाची नांवे असलेल्या पानाची छायांकित प्रत, आर्थिक मदतीच्या हिरव्या कार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत व आधार कार्डची छायांकित प्रत तसेच इतर क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र सादर करावीत. या संधीचा जास्तीत-जास्‍त लाभ माजी सैनिकांनी घ्यावा असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
*****

01 August, 2018

जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन




जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस अभिवादन
हिंगोली,दि.01: साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणीयार,निवासी उपजिल्हाधिकारी श्री.पठाण, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी(सा.प्र.) श्री. बोरगांवकर, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी आदिंसह‍ प्रशासकीय इमारतीमधील सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
                                                           ***** 

समाज माध्यमावरील माहितीची सत्यता पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती टाकू नये पोलिस अधिक्षक योगेश कुमार



 समाज माध्यमावरील माहितीची सत्यता पडताळणी केल्याशिवाय कोणतीही माहिती टाकू नये
                                                                                                पोलिस अधिक्षक योगेश कुमार

        हिंगोली, दि.01: फेसबुक, इन्स्टाग्राम, व्टिटर, व्हॉट्स अॅप आदी समाज माध्यमे आज नागरिकांच्या जीवनाचा एक महत्वाचा भाग बनली आहेत. समाजमाध्यमातून आलेल्या माहितीची सत्यता पडताळणी न करताच पुढे (फॉरवर्ड) पाठविली जाते. परंतू अशा अफवा पसरविणाऱ्या माहितीमुळे समाजातील वातावरण बिघडून त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याकरीता नागरिकांनी समाज माध्यमांवरील माहिती पुढे पाठवितांना (फॉरवर्ड) माहितीची सत्यता पडताळूनच पाठवावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी केले.
            जिल्हा माहिती कार्यालय आणि पोलिस अधिक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस अधिक्षक कार्यालय येथील नागनाथ सभागृहात माध्यम प्रतिनीधीसाठी ‘फेक न्यूज परिणाम आणि दक्षता’ या विषयावरील कार्यशाळेत श्री. योगेश कुमार हे बोलत होते. यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार तोष्णीवाल, पोलिस उपविभागीय अधिकारी (गृह) सुजाता पाटील, पोलिस निरिक्षक (स्था. गु.शा.)  जगदीश भंडारवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी श्री. योगेश कुमार म्हणाले की, मागील काही दिवसात काही समाजकंटकांमार्फत व्हॉट्स अॅप, व्टिटर, फेसबुक, आदी समाज माध्यमातून मुले पळविणारी टोळी आली किंवा चोर आले अशा प्रकारच्या निरर्थक आणि खोट्या अफवा पसरविल्या जात आहेत. अशा खोट्या अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून निष्पाप नागरिकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले असून, अशा खोट्या अफवांमुळे आतापर्यंत 13 घटनांत 27 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यातून अशा जमावावर खुनासारखे गंभीर गुन्हे देखील दाखल झाले आहेत. अशा अफवा पसरविल्या जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. 
            प्रगत तंत्रज्ञानामुळे आज सहज उपलब्ध असणाऱ्या समाज माध्यमांद्वारे काही क्षणात अफवा पसरविता येतात. आजच्या गतीमान काळात नागरिक माहितीची सत्यता पडताळणी न करता किंवा होणाऱ्या परिणामाचा विचार न करता माहिती पुढे पाठवतात. यामुळे समाजातील महापुरुष, जाती, धर्म, ग्रंथ शासनाविरुद्धच्या खोटी माहिती किंवा पोस्टची सत्यता पडताळून न पाहता फॉरवर्ड करणे संबंधीतास घातक ठरु शकते. समाज माध्यमांवर कोणाचेही नियंत्रण नसल्यामुळे माहितीची सत्यता पडताळणी होत नाही. तसेच एखाद्या पोस्टबद्दल तक्रार करण्याची सुविधा व्हॉट्सॲप या माध्यमावर नाही. खोट्या अफवा पसरण्यापासून रोखणे ही आपली नैतीक जबाबदारी आहे. त्याचप्रमाणे तरुणांनी कोणतीही माहिती फॉरवर्ड करण्यापूर्वी ती घटना, पोस्ट खरी आहे का याची खात्री करावी.तसेच आवश्यकता पडल्यास त्यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. समाज माध्यमांसंबधीत कायदा अत्यंत कठोर असून, यात दोषी आढळल्यास संबंधीतावर कडक शिक्षेची देखील तरतूद असल्याची माहिती दिली. तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे, असे ही पोलिस अधिक्षक योगेश कुमार यावेळी म्हणाले.
            यावेळी अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ म्हणाले की, समाज माध्यमांचा वापर हा चांगल्या कामाकरीता होणे आवश्यक आहे. परंतू काही समाज विघातक लोक याचा दूरुपयोग करुन समाजामध्ये गैरसमज पसरविण्याचे काम करतात. हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे एस. टी. महामंडळाचे वाहक आणि वाहनचालक कर्तव्यावर मुक्कामी गेले असता. गावकऱ्यांनी त्यांना मुले चोरणारे समजून मारहाण केली होती. सदर घटना बासंबा पोलीस स्टेशन हद्दीत घडली असल्याने बासंबा येथील दोषी गावकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी उदाहरण दिले. त्यामुळे समाज माध्यमांवरील खोट्या अफवापासून सावध रहा.खोट्या अफवांची सत्यता पडताळणीकरीता https://www.google.com/ , https://www.altnews.in/ किंवा इतर संकेतस्थळाचा वापर करावा.
            समाज माध्यमावरील निरर्थक आणि खोट्या अफवांवर विश्वास ठेवू नका. अशी काही माहिती मिळाल्यास तातडीने जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. जर कोणी अशा अफवा पसरवित असेल तर त्याचे नाव पोलिसांना कळवावे. खात्री केल्याशिवाय सोशल मिडीयावर आलेला कोणताही मॅसेज अन्य ठिकाणी फॉरवर्ड करू नये. सोशल मिडियातून आलेल्या मॅसेजवर विश्वास ठेवू नये. तसेच अशा प्रकारचे अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्ष, हिंगोली (दूरध्वनी क्र. 02456-220232, 7218626101) येथे संपर्क साधावा, असे आवाहन ही श्री. गुंजाळ यांनी यावेळी केले.
            प्रारंभी जिल्हा पोलिस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर पोलिस अधिक्षक सचिन गुंजाळ, पोलिस निरिक्षक जगदीश भंडारवार यांचा महामानव हा ग्रंथ देवून सत्कार करण्यात आला.
            यावेळी कार्यशाळेस प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमातील प्रतिनीधींची उपस्थिती होती. कार्यशाळेचे प्रास्ताविक जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले.
            तसेच सुत्रसंचलन पोलिस निरिक्षक (स्था.गु.शा.) जगदीश भंडारवार यांनी केले तर उपविभागीय पोलिस अधिकारी (गृह) सुजाता पाटील यांनी आभार मानले.
****