21 April, 2022

 

जननीच्या जनजागृतीने बालविवाह रोखण्यात यश

 

हिंगोली (जिमाका),  दि. 21 : जिल्ह्यात महिलाच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन सुरु केलेल्या जननी उपक्रमाच्या जनजागृतीमुळे बालविवाह रोखण्यात पोलिसांना यश आले आहे. जननी उपक्रमामुळे महिलांच्या मनात पोलिसांविषयी विश्वास निर्माण झाला असून डायल 112 क्रमांकावर संपर्क साधला जात आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात जननी उपक्रम हाती  घेण्यात आला आहे. अल्पवयीन बालिकेचा बालविवाह होणार असल्याची माहिती पोलिस विभागाला मिळताच आखाडा बाळापुर पोलिस स्टेशन सपोनि पंढरीनाथ बोधनापोळ व सहायक पोलीस उपनिरीक्षक सिद्दीकी यांच्या सहकार्याने तसेच जिल्हा महिला व बालविकास अधिकारी व्ही.जी.शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार हा बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

            हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यातील सर्व गावामध्ये जननी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमातून दिलासा मिळाल्यानेच कळमनुरी येथील माळी गल्ली येथील बालिकेचा बालविवाह बेलथर येथे होणार होता, असा  डायल 112 वर कॉल आला. गावात काही दिवासाने बालविवाह होणार असून हा बालविवाह थांबविण्याची विनंती करण्यात आली. याची माहिती मिळताच बाळापूर पोलीस स्टेशनचे पोह. पंढरी चव्हाण, मपोह. रोहिणी इंगाले, मपोशी.सुचित्रा कोंडामंगल तसेच जिल्हा बालसंरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बालसंरक्षण अधिकारी गणेश मोरे, बालसंरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, क्षेत्र कार्यकर्ता अनिरुध्द घनसावंत यांच्या पथकाने नियोजित 25  एप्रिल, 2022 रोजी होणारा बालविवाह थांबविण्यात आला.

            दोन्ही पथकाने अल्पवयीन मुलीचे तसेच आई-वडील व नातेवाईकाचे समुपदेशन केले. बालविवाहाचे दुष्परिणाम मुलीचे शिक्षण व भविष्याविषयी मार्गदर्शन केले. हमीपत्र लिहून घेण्यात आले व बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006 नुसार हा गुन्हा आहे या कायद्याचे पालन न केल्यास कठोर कार्यवाही करण्यात येईल, असा इशारा प्रशासना कडून देण्यात आला असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी  प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

******

 

आदिवासी स्वयंसहायता बचत गटांनी

पोल्ट्री फॉर्म स्थापन करण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका),  दि. 21 : विशेष केंद्रीय सहाय योजनेअंतर्गत जनउत्कर्ष, जनउत्थान महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सन 2013-14 या वर्षात स्थापन करण्यात आलेल्या अथवा नव्याने स्थापित झालेल्या आदिवासी स्वयंसहायता बचतगटांना व्यवसायासाठी पोल्ट्री फार्म स्थापन करुन देण्यासाठी पात्र  बचत गटाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी जि. हिंगोली येथे उपलब्ध आहेत.

इच्छूक लाभार्थ्यांनी या योजनेचा परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 26 एप्रिल ते 5 मे, 2022 या कालावधीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी जि. हिंगोली यांच्याकडे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ही योजना सामुहिक स्वरुपाची असून या योजनेसाठी आदिवासी स्वयंसहायता बचत गट हे जनउत्कर्ष, जनउत्थान महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत स्थापन करण्यात आलेल्या अथवा नव्याने स्थापित झाल्याबाबतचे नोंदणीकृत प्रमाणपत्र,  बचत गटातील सर्व सभासदाचे आदिवासी जातीचे असल्याचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, बचत गटातील किमान एका लाभार्थ्यांकडे एक एकर जमीन, बारमाही पाणी, वीज आदी सुविधा असल्याचे सातबारा, विहिर नोंद, मोटार वीजपंप प्रमाणपत्र, चालू वर्षातील वीज बील, होल्डींग आदी कागदपत्रे, फॉर्मसाठी बचत गटाला किमान पाच वर्षे जमीन वापरास देत असल्याचे जमीन मालकाचे व बचत गटातील सर्व सदस्यांचे शंभर रुपयांच्या स्टँपपेपरवरचे रजिस्टर हमीपत्र, बचतगटाचा चालू व्यवहार असल्याचा बँक पासबूकची झेरॉक्स प्रत, रहिवाशी प्रमाणपत्र, ओळखपत्र किंवा आधारकार्ड, योजनेचा यापूर्वी लाभ घेतला नसल्याचे प्रमाणपत्र, दोन पासपोर्ट साईज छायाचित्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी जि. हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.   

*****

 

आदिवासी शेतकऱ्यांनी शेळी गट पुरवठा करण्यासाठी

अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका),  दि. 21 : भारतीय संविधान अनुच्छेद 275 (1) अंतर्गत अनुसूचित जमातीच्या वनहक्क कायदा-2006 अंतर्गत वनपटे प्राप्त असणाऱ्या आदिवासी शेतकऱ्यांना शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेळीगट पुरवठा करावयाचा आहे. यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या योजनेचे विहित नमुन्यातील अर्ज प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी जि. हिंगोली येथे उपलब्ध आहेत.

इच्छूक लाभार्थ्यांनी या योजनेचा परिपूर्ण अर्ज आवश्यक त्या कागदपत्रासह दि. 26 एप्रिल ते 5 मे, 2022 या कालावधीत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी जि. हिंगोली यांच्याकडे कार्यालयीन वेळेत सादर करावेत. विहित मुदतीनंतर आलेले व परिपूर्ण नसलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

ही योजना वैयक्तीक स्वरुपाची असून या योजनेसाठी वनहक्क कायदा-2006  अंतर्गत वनपटे प्राप्त असणारा आदिवासी शेतकरी असावा. वनपटे प्राप्त झाल्याबाबतचे प्रमाणपत्र व सातबारा उतारा,  अनुसूचित जमातीचे सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र, 2022 या वर्षाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र (स्वयंघोषित), आधार कार्ड छायांकित प्रत, आधार जोडणी असलेले अर्जदाराचे बँक पासबूक, दोन पासपोर्ट साईज छायाचित्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे, असे प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळमनुरी जि. हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.   

*****

 

अन्न व्यवसायिकांनी फोसकॉस ऑनलाईन प्रणालीवर

भ्रमणध्वनी व ई-मेल पत्ता अद्यावत करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका),  दि. 21 : सद्यस्थितीत सर्व अन्न व्यावसायिकांना देण्यात येणारे परवाने व नोंदणी प्रमाणपत्रे फोसकॉस (FosCos.fssai.gov.in) या संकेतस्थळावर अर्ज केल्यावर प्राप्त होतात. तथापि बऱ्याच वेळा अर्ज करताना भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल पत्ता हा अन्न व्यवसायिक यांच्या स्वत:चा नसतो. तसेच बहुतांश वेळी भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल पत्ता बदललेला असतो. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन तसेच अन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्याद्वारे पाठवण्यात आलेल्या सूचना , सुधारणा नोटीस, कायदेशीर नोटीस व काही अधिसूचना पुढील कार्यवाहीसाठी त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. तसेच अन्न परवाना, नोंदणी प्रमाणपत्र नुतनीकरण करताना बऱ्याच अडचणी येतात.

त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व अन्न व्यवसायिक परवानाधारक, नोंदणी धारक ज्यामध्ये खाद्यपदार्थ उत्पादक, रिपाकर, घाऊक विक्रेते, किरकोळ विक्रेते, वितरक, हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसायिक, फिरते विक्रेते व इतर सर्व अन्न व्यवसायिकांनी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल पत्ता अद्यावत करुन घ्यावेत. त्यासाठी अन्न व औषध प्रशासन कार्यालय, परभणी यांच्याकडे लेखी स्वरुपात अर्ज सादर करावा. या अर्जासोबत परवाना अथवा नोंदणी प्रमाणपत्राची प्रत, आधार कार्ड आदी जोडून कार्यालयात दाखल करुन समक्ष अद्यावत करुन घ्यावेत, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त नारायण सरकटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

20 April, 2022

 

विमा सल्लागार भरतीसाठी 28 एप्रिल रोजी मुलाखतीचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका),  दि. 20 : परभणी डाक विभागाकडून डाक जीवन विमा (PLI) आणि ग्रामीण डाक जीवन विमा (RPLI) योजनेअंतर्गत डायरेक्ट एजंट (विमा सल्लागार) च्या भरतीसाठी दि. 28 एप्रिल, 2022 रोजी सकाळी 9.00 ते सायं.6.00 या वेळेत अधीक्षक, डाकघर, परभणी विभाग, परभणी येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत. यासाठी सर्व इच्छूक उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज भरुन अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी येथे थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावेत, असे आवाहन अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी यांनी केले आहे.   

            हे अर्ज डाकघर अधीक्षक कार्यालय, परभणी विभाग, परभणी येथे उपलब्ध आहेत. हे अर्ज परिपूर्ण भरुन मुलाखतीसाठी येताना बायोडाटा, मूळ कागदपत्रे, प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे. या पदासाठी पात्रता व मापदंड पुढीलप्रमाणे आहेत.

मुलाखतीच्या दिवशी उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त 50 वर्षे दरम्यान असावे. अर्जदार हा दहावी उत्तीर्ण किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण केलेला असावा. त्याला केंद्रीय, राज्य मान्यता प्राप्त असणे आवश्यक आहे. बेरोजगार, स्वयं बेरोजगार, माजी विमा सल्लागार, कोणत्याही विमा कंपनीचा माजी विमा एजंट, माजी सैनिक, सेवानिवृत्त शिक्षक, अंगणवाडी कार्यकर्ते, महिला मंडळ कार्यकर्ते, ग्राम प्रधान, ग्रामपंचायत सदस्य आदींनी टपाल जीवन विमासाठी थेट अर्ज करु शकतात. उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे होणार असून व्यावसायिक कौशल्य, व्यक्तीमत्व, जीवन विमाबाबतचे ज्ञान, संगणकाचे ज्ञान, स्थानिक भागाची माहिती असणे आवश्यक आहे. निवड झालेल्या उमेदवारास पाच हजार रुपयांची अनामत रक्कम ठेव म्हणून ठेवावी लागेल. जी एनएससी/केव्हीपीच्या स्वरुपात असेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर डाक विभागाकडून  तात्पुरत्या स्वरुपात परवाना देण्यात येईल. जो आयआरडीएची परवाना परीक्षा पास केल्यानंतर कायम स्वरुपाच्या परवानामध्ये रुपांतरीत केले जाईल. ही परीक्षा तीन वर्षाच्या आत उत्तीर्ण करणे अनिवार्य राहील. नियुक्ती ही लायसन्स तत्वावर आणि कमिशन तत्वावर राहील, असे अधीक्षक डाकघर, परभणी विभाग, परभणी यांनी कळविले आहे.    

*****

 

हिंगोली जिल्ह्यासाठी 627 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

 

हिंगोली (जिमाका),  दि. 20 : सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने माहे एप्रिल, मे व जून-2022 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या तीन महिन्‍याचे जिल्‍ह्यासाठी  627 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधित स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  

तालुकानिहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे.  हिंगोली-162 क्विंटल, औंढा ना.-90 क्विंटल, सेनगाव-105 क्विंटल, कळमनुरी-150 क्विंटल, वसमत-120 क्विंटल असे जिल्ह्यासाठी एकूण 627 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी  केले आहे.

*****


18 April, 2022

 

आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशासाठी पात्रता परिक्षेचे आयोजन

30 एप्रिल पर्यंत आवेदन पत्र सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 18 : हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शासकीय, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील केंद्र शासनाद्वारे संचलित शासकीय एकलव्य शाळेत प्रवेश घेण्यासाठी शासनाने प्रवेश पात्रता परिक्षा आयोजित केली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रवेश अर्ज प्राप्त करुन घ्यावा आणि तो अर्ज भरुन मुख्याध्यापकांकडेच सादर करावा. याचा लाभ घेण्यासाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले अनुसूचित/आदिम जमातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशासाठी प्रोत्साहित करावेत. प्रवेश पात्रता परिक्षेचे आवेदन पत्र प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली येथून प्राप्त करुन घ्यावेत. तसेच शासकीय आश्रमशाळा, जामगव्हाण, गोटेवाडी, बोथी, पिंपळदरी, शिरडशहापूर येथील मुख्याध्यापक यांच्याकडेही अर्ज उपलब्ध आहेत.

या प्रवेश पात्रता परिक्षेचे आवेदन पत्र दि. 30 एप्रिल, 2022 पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली येथे सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली यांनी केले आहे.

*****