18 April, 2022

 

आदिवासी विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशासाठी पात्रता परिक्षेचे आयोजन

30 एप्रिल पर्यंत आवेदन पत्र सादर करण्याचे आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 18 : हिंगोली व परभणी जिल्ह्यातील शासकीय, जिल्हा परिषद शाळा, अनुदानित, विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवी, सहावी, सातवी, आठवीमध्ये शिकत असलेल्या अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्यातील केंद्र शासनाद्वारे संचलित शासकीय एकलव्य शाळेत प्रवेश घेण्यासाठी शासनाने प्रवेश पात्रता परिक्षा आयोजित केली आहे.

ज्या विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडून प्रवेश अर्ज प्राप्त करुन घ्यावा आणि तो अर्ज भरुन मुख्याध्यापकांकडेच सादर करावा. याचा लाभ घेण्यासाठी पालकाचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेले अनुसूचित/आदिम जमातीचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे. 

सर्व शाळेतील मुख्याध्यापकांनी अनुसूचित/आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना एकलव्य शाळेत प्रवेशासाठी प्रोत्साहित करावेत. प्रवेश पात्रता परिक्षेचे आवेदन पत्र प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली येथून प्राप्त करुन घ्यावेत. तसेच शासकीय आश्रमशाळा, जामगव्हाण, गोटेवाडी, बोथी, पिंपळदरी, शिरडशहापूर येथील मुख्याध्यापक यांच्याकडेही अर्ज उपलब्ध आहेत.

या प्रवेश पात्रता परिक्षेचे आवेदन पत्र दि. 30 एप्रिल, 2022 पर्यंत प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली येथे सादर करावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी जि.हिंगोली यांनी केले आहे.

*****

No comments: