29 April, 2022

 

कोविड-19 मुळे विधवा झालेल्या महिलांना मिशन वात्सल्य योजनेचा लाभ

 

हिंगोली, (जिमाका) दि. 29 : कोरोनामुळे घरातील कर्त्या पुरुषाचे निधन होऊन एकल, विधवा झालेल्या महिलांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी शासनाने मिशन वात्सल्य योजना सुरु केली आहे. यासाठी जिल्ह्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या नियमित बैठका होत आहेत. कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत जवळपास 510 जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना व कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे निधन होऊन एकल, विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.   

यामध्ये कुटुंब निवृत्ती योजना, शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, बँक खाते, आधार कार्ड, जन्म मृत्यू दाखला, मालमत्ता विषयक हक्क, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, घरकुल योजना यासह इतर 24 योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोविड-19 काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या 174 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ देण्यात आला आहे. तसेच कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या तीन बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यात आले आहे. कोविड काळात आजपर्यंत जिल्ह्यात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली 44 बैठका झाल्या आहेत. यामध्ये हिंगोली तालुका 08, कमळनुरी तालुका 10, सेनगाव तालुका 09, औंढा नागनाथ तालुका 08 आणि वसमत तालुक्यातील 09 बैठकांचा समावेश आहे.

मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत कोविड-19 मुळे विधवा झालेल्या 251 महिलांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात आला. यामध्ये हिंगोली 351, कळमनुरी 415, सेनगाव 261, औंढा नागनाथ 277, वसमत 430 याप्रमाणे 1734 योजनांचा लाभ देण्याबाबतची कार्यवाही करण्यात आली असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

****

No comments: