06 April, 2022

 


कायद्याची माहिती गावागावात पोहोचविणारा जननी हा स्तूत्य उपक्रम

-जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

हिंगोली, दि. 06  (जिमाका) :  जननी कार्यक्रमाच्या माध्यमातून कायद्याची माहिती गावागावात पोहोचून स्त्रियांना सक्षम करण्यात येणार आहे. हा अत्यंत स्तूत्य उपक्रम असून या उपक्रमांची इतिहासात नोंद होईल, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

येथील शिवाजी देशमुख सभागृहात हिंगोली जिल्हा पोलीस दलातर्फे महिला सुरक्षा व अत्याचार प्रतिबंधाच्या अनुषंगाने कायदेविषयक जनजागृतीसाठी जननी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे,  आमदार संतोष बांगर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, स्त्री समाज सक्षम करण्यासाठी जननीच्या कार्यक्रमात सर्व महिलांना समाविष्ट करुन घेण्यासाठी ग्राम पातळीवरील सर्व यंत्रणाना सूचना देण्यात येणार आहेत. सर्वांनी एकत्र येऊन हा कार्यक्रम यशस्वी केल्यास त्याचा फायदा अधिक होणार आहे. महिलाविषयींच्या कायद्याची माहिती गावागावात पोहोचून स्त्रियांना सक्षम करण्यात येणार आहे. प्रत्येक गावागावात जाऊन त्याची प्रसिध्दी होणार आहे. यामुळे कामकाजाला गती आल्याशिवाय राहणार नाही. जननी आणि जन्मभूमी हे स्वर्गापासून उच्च असलेल्या या दोन महिला आहेत. जननीच्या नावाने हा उपक्रम सुरु करत आहात याचे फार महत्‍व आहे, असे सांगितले.

मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने म्हणाले, सहशीलता संपल्यानंतर ती मरते. त्यामुळे मुलींनी व महिलांनी स्वत:हून घडलेल्या प्रकाराची माहिती घरी किंवा पोलिसांना देणे गरजेचे आहे. यासाठी आई, शिक्षिका आणि शासकीय यंत्रणा यांची महत्वाची भूमिका आहे, असे सांगितले

यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे,  आमदार संतोष बांगर, अपर पोलीस अधीक्षक यशंवत काळे आणि सरकारी वकील ॲड. सविता देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्ह्यात वाढत्या महिला अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन सर्व ठाणे हद्दीतील गावामध्ये जननी महिला सक्षम समाज अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती दिली. या अभियानाद्वारे प्रत्येक गावात पोलीस अधिकारी, कर्मचारी जाऊन व्हिडीओ सादरीकरण, बॅनर, पोस्टर व समुपदेशन करुन महिलांच्या कायद्याची जनजागृती करणार आहेत. यासाठी आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार प्रत्येक गावात जाऊन स्त्रीभ्रूण हत्या, महिला अत्याचार, नाबालिक, विवाहित, विधवा, परित्यक्त्या, वृध्द महिला व बालकांचे लैंगिक शोषण, मानसिक व आर्थिक शोषण, अत्याचार पिडित महिला आदींची जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले.

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला, नागरिक उपस्थित होते.   

 

*****

No comments: