01 April, 2022

 

कोरोना विषाणू रोगाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे सर्व आदेश रद्द

आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोविड अनुरुप वर्तनाचे नागरिकांनी पालन करावे

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन

 

            हिंगोली, (जिमाका) दि. 01 : राज्यात 13 मार्च, 2020 पासून साथरोग अधिनियम 1897 ची अंमलबजावणी सुरु आहे. हिंगोली जिल्ह्यात कोरोना विषाणू (कोविड-19) या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव होण्यास प्रतिबंध करण्यासाठी या अधिनियिमांतर्गत खंड 2, 3 व 4 नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले आदेश सद्यस्थितीत हिंगोली जिल्ह्यात लागू आहेत.

            महाराष्ट्र राज्यात कोविड-19 विषाणूचे संक्रमण कमी होत असल्याने साथरोगासंदर्भात लावण्यात आलेले प्रतिबंध उठवण्याचे निर्देश राज्य शासनाने दि. 31 मार्च, 2022 रोजी दिलेले आहेत. त्याअनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील नागरी, ग्रामीण तसेच औद्योगिक क्षेत्रातील जनता, व्यक्ती, आस्थापना यांना उद्देशून जिल्हा प्रशासनाने यापूर्वी लागू केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश रद्द करणे आवश्यक असल्याने जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर यांनी हिंगोली जिल्हा सीमा क्षेत्रात जमावबंदी, संचारबंदी व साथरोग संदर्भातील वेळोवेळी जारी केलेले सर्व आदेश दि. 01 एप्रिल, 2022 च्या मध्यरात्री 00.00 वाजेपासून रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तथापि, आरोग्याच्या दृष्टिकोनातून कोविड अनुरुप वर्तनाचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

            या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व सर्व मुख्याधिकारी , नगर परिषद/नगर पंचायत यांची असेल, असेही आदेशात नमूद केले आहे.  

***** 

No comments: