21 April, 2022

 





कृषीमंत्री  दादा भुसे यांच्या हस्ते गोळेगाव येथील कृषी महाविद्यालय इमारतीचे उद्घाटन

शेतकऱ्यांना खताचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही

- कृषि मंत्री दादाजी भुसे

* प्रत्येक महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी बचत गटामार्फत लघु उद्योग सुरु करावा

हिंगोली (जिमाका),  दि. 21 :  शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत खताचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी आज केले.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत असलेल्या औंढा नागनाथ तालुक्यातील गोळेगाव येथील कृषि महाविद्यालयाच्या इमारतीचे व महिला शेतकरी परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन आज राज्याचे कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते झाले . त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.अशोक  ढवण हे होते. यावेळी आमदार डॉ. राहुल पाटील, तहसीलदार डॉ.कृष्णा कानगुले, जिल्हा परिषद सदस्य अंकुश आहेर, नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. धर्मराज गोखले, अभियंता दिगंबर पोतरे, गोळेगाव येथील कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य डॉ.भगवान आसेवार हे उपस्थित होते.

यावेळी कृषी मंत्री  दादाजी भुसे म्हणाले, शेतकऱ्यांना खताचा तुटवडा होऊ दिला जाणार नाही. शेतामधील वन्य प्राण्यापासून होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतीच्या कडेला काटेरी झाडे लावून वन्य प्राण्यांपासून आपले पीक वाचण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

बचत गटातील महिलांना परिसंवादात मार्गदर्शन करताना कृषी मंत्री श्री.भुसे म्हणाले, प्रत्येक महिलांनी स्वावलंबी बनण्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून लघु उद्योग सुरु करावेत. या लघु उद्योगातून तयार केलेला माल विक्रीसाठी बाजारपेठेमध्ये आणावा. त्यासाठी  स्वतंत्र जागा देण्याबरोबरच प्रत्येक महिला बचत गटाला बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल,असेही त्यांनी सांगितले.

याप्रसंगी कृषी मंत्री दादा भुसे यांनी इमारतीचे उद्घाटन झाल्यानंतर इमारतीच्या परिसराची पाहणी केली व  कुलगुरु, प्राचार्य व प्राध्यापक यांचे कौतुकही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.संतोष वाघमारे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पुंडलिक वाघमारे यांनी केले. यावेळी कृषि महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी, औंढा तालुक्यातील बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.  

*****

No comments: