03 October, 2024

कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर 102 कोटी वितरीत • सन 2023 च्या खरीप हंगामाचे अर्थसहाय्य जमा • शेतकऱ्यांनी ई-केवायसी वेळेत पूर्ण करावी - डॉ. राजेंद्र कदम

हिंगोली, दि. 03 (जिमाका) : सन 2023 च्या खरीप हंगामामधील ई-पीक पाहणी नोंदविलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर पहिल्या टप्प्यात शासनाकडून 102 कोटी 26 लाख रुपयांचे अर्थसहाय वाटप केले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाव्दारे दिली आहे. खरीप हंगाम 2023 मधील ई-पीक पाहणी नोंदविलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये व अधिकतम 2 हेक्टरच्या मर्यादेत अर्थसहाय्य महाराष्ट्र शासन कृषि विभागामार्फत संबंधितांच्या बँक खात्यावर वाटप सुरू झाले आहे. हिंगोली जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सन 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई-पीक अँप पोर्टलद्वारे कापूस 37 हजार 096 व सोयाबीन 3 लक्ष 66 हजार 460 असे एकूण जिल्ह्यामध्ये 4 लक्ष 3 हजार 556 लक्षांक होते. त्यापैकी कापूस 28 हजार 160 व सोयाबीन 2 लक्ष 81 हजार 787 असे एकूण जिल्ह्यामध्ये 3 लक्ष 9 हजार 947 लागवडीची ई-पीक नोंदणी करण्यात आलेल्या शेतकऱ्यांची संमती पत्र घेऊन पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहेत. ई-पीक पाहणी अँप, पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार व त्या प्रमाणातच परिगणना करुन अर्थसहाय्य हिंगोली तालुक्यातील 20 कोटी 88 लाख, कळमनुरी तालुक्यातील 19 कोटी 81 लाख, वसमत तालुक्यातील 19 कोटी 42 लाख, सेनगाव तालुक्यातील 26 कोटी 17 लाख तर औंढा ना. तालुक्यातील 15 कोटी 98 लाख असे एकूण हिंगोली जिल्ह्यातील 102 कोटी 26 लाख रुपयांचे सोयाबीन व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अर्थसहाय्य वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीव्दारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये केवळ थेट लाभ हस्तांतरण माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांची केवायसी प्रलंबित असल्यामुळे त्यांनी सामायिक सुविधा केंद्र किंवा संबंधित कृषि सहाय्यक यांच्याकडे ई-केवायसी त्वरित पूर्ण करून घ्यावी. केवायसी पूर्ण झाल्यावर त्यांच्या खात्यावर अर्थसहाय्य जमा करणे शासनास सुलभ होईल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ******

No comments: