03 October, 2024
अधिसूचित सेवा तात्काळ ऑनलाईन करा - जिल्हाधिकारी
हिंगोली (जिमाका), दि. 03 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार जिल्ह्यातील अधिसूचित केलेल्या लोकसेवांची माहिती तात्काळ ऑनलाईन सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हास्तरीय विभागप्रमुखांच्या बैठकीमध्ये याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. त्यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, मुख्याधिकारी अरविंद मुंढे, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के, प्रशांत दिग्रसकर आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमानुसार अधिसूचित केलेल्या सर्व सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी अर्जदारांना आपले सरकार सेवा पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करावे. त्याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करावी. त्यामुळे अधिसूचित कालावधीत या सेवा वेळेत पुरविण्यात येतील. ऑफलाईन दिलेल्या सेवा पोर्टलवर दिसत नसल्यामुळे केलेली कामेही येथे ऑनलाईन दिसत नाहीत. त्यामुळे या सर्व सेवा ऑनलाईन करून घ्याव्यात. तसेच विभाग प्रमुखाकडे आलेल्या अर्जाची संख्या, निकाली काढलेल्या अर्जाची संख्या, अपिलाची संख्या आदीचे आकडे तपासून घ्यावेत. तसेच पोर्टलवर अधिसूचित सेवा वेळेत पूर्ण न करण्यामागची कारणे, ऑनलाइन सेवा देता येणे शक्य असताना त्या ऑफलाईन देण्यामागची कारणे नमूद करावीत. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माहितीचे वाचन सर्व ग्रामपंचायतीमध्ये 26 जानेवारी 2024 रोजी करावयाचे होते. याबाबतचाही कार्यपूर्ती अहवाल सादर करावा. तसेच आदर्श आपले सरकार सेवा केंद्रामध्ये सेवा उपलब्ध करून देण्याचे दर, कालावधी आणि वेळेत पूर्ण करण्यात येणारे सेवा केंद्रांची माहिती प्रदर्शित करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी यावेळी दिल्या.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाचे जिल्हा समन्वयक सागर भुतडा व जिल्हाधिकारी कार्यालयातील आयटी कक्षाचे प्रकल्प व्यवस्थापक नीरज धामणगावे यांनी अधिनियमांतर्गत विभागनिहाय प्राप्त झालेल्या व त्यावर कार्यवाही झालेल्या अर्जाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
यावेळी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा देणाऱ्या सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment