03 October, 2024
जिल्हाधिकारी कार्यालयात शौर्य दिन उत्साहात साजरा
हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारतीय सैन्य दलाने दि. 29 सप्टेंबर, 2016 रोजी पाकिस्तानच्या हद्दीत घुसून सर्जिकल स्ट्राईकद्वारे अतिरेक्यांचा खात्मा केला. भारतीय सैन्याची ही अभिमानास्पद कामगिरी राज्यातील जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी व माजी सैनिकांचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी दि. 29 सप्टेंबर रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो, परंतु यावर्षी 29 सप्टेंबर रोजी रविवार आल्यामुळे दि. 30 सप्टेंबर रोजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शौर्य दिन साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड, लेखा अधिकारी, माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष, वीर माता, वीर पिता यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व भारत माता, वीर जवानांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
याप्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी शौर्य दिनाचे महत्व सांगून शौर्य दिन आयोजनाची भूमिका स्पष्ट केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. यावेळी दुसऱ्या महायुध्दातील माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा, वीर माता, वीर पिता यांचा सत्कार करण्यात आला. शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. तर जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे ऑनररी कॅप्टन तुकाराम रामराव मुकाडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सय्यद मीर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कल्याण संघटक सुरेश भालेराव, पाईकराव दलीत धरबा, कडूजी टापरे, पाईकराव काशिनाथ सुदामराव तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी यांनी स्थानिक परिस्थितीनुसार अत्यंत साधेपणाने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment