04 October, 2024
बालविवाह विरोधी सक्षम गावे करण्यासाठी जिल्हास्तरीय बैठक संपन्न
हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्ह्यात शासकीय यंत्रणेच्या मध्यमातून बालविवाह प्रतिबंधासाठी जाणीव जागृतीद्वारे जिल्ह्याला सक्षम करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) गणेश वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय बैठक संपन्न झाली.
या बैठकीत ग्रामपंचायत आणि अंगणवाडी यांच्या माध्यमातून अतिजोखीम घटकांतील मुलीच्या नोंदी घेऊन त्यांचा बालविवाह होऊ नये यासाठी त्यांना सामाजिक पालकत्व घेण्यासाठी आवाहन करणे, तसेच पात्र मुलींना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेशी जोडणे, तसेच इतर शासकीय योजनेशी जोडणे या विषयावर चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यात बालविवाह निर्मूलनावर काम करणाऱ्या सर्व विभाग प्रमुखांनी प्रत्येक गावामध्ये ग्राम बाल संरक्षण समितीचे गठन आणि त्या सक्रीय करण्यासाठी पंचायत विभागाकडून प्रयत्न करणे, शिक्षण विभाग व एकात्मिक बाल विकास विभागाकडून बालविवाह निर्मूलन विषयी रॅली काढून घोषणाद्वारे जाणीव जागृती करणे, दर सोमवारी बालविवाह विषयीची शपथ घेणे. शाळेमध्ये चित्रकला, निबंध, वकृत्व स्पर्धेचे आयोजन करणे. शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून मानवी साखळी तयार करून बालविवाहाची शपथ घेणे, अंगणवाडी सेविकाच्या माध्यमातून प्रत्येक गावात बालविवाह विषयीचे पोस्टर चिटकवणे, तसेच किशोरवयीन मुलीचे समुपदेशन आणि विवाहाच्या स्थितीच्या नोंदी ठेवणे, सेवा पुरवठादार याच्या बैठका घेणे. तसेच गावात बालविवाह होऊ नये म्हणून ठराव सुद्धा घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. जिल्ह्यात बालविवाह विषयी जाणीव जागृती करून प्रत्येकाला सक्षम करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बालकल्याण) गणेश वाघ, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, विस्तार अधिकार श्री. गुढे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एन. फोपसे, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे व सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment