23 October, 2024
हिंगोली जिल्ह्यातील विद्यार्थी देणार पालकांना मतदानाचे भेटकार्ड • मतदान जनजागृतीसाठी हिंगोली जिल्हा स्वीप समितीचा अभिनव उपक्रम
हिंगोली, दि.23 (जिमाका): जिल्ह्यात महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी स्विप समिती वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. दिवाळी सणाची आणि सुट्ट्यांची चाहूल विद्यार्थ्यांना लागली असताना दिवाळी भेट कार्ड मोठ्या प्रमाणात ते तयार करून भेट देत असतात. हाच धागा पकडून शालेय- महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी पालकांना निवडणुकीवर विविध प्रकारचे भेट कार्ड तयार करून भेट देण्याचे आवाहन जिल्हा स्वीप नोडल अधिकारी प्रशांत दिग्रसकर आणि संदीप सोनटक्के यांनी यावेळी केले आहे.
विद्यार्थ्यांनी स्वतः निवडणूक विषयाच्या अनुषंगाने बनवलेले भेट कार्ड पालकांना देतानाचे फोटो प्रसार माध्यम, समाज माध्यमावर प्रसारित करण्याचेही आवाहन यावेळी करण्यात आले आहे. #vidhansabha nivadnuk, #मी मतदान करणार #election 2024 इत्यादी हॅशटॅग वापरण्याचेही सांगण्यात आले आहे. बहुसंख्येने आणि नाविन्यपूर्ण भेट कार्ड बनवण्यासाठी प्रेरित करणाऱ्या केंद्रप्रमुखांना जिल्हाधिकारी यांच्या स्वाक्षरीच्या प्रमाणपत्राने गौरविण्यात येणार असल्याचेही जिल्हा स्विप नोडल अधिकारी प्रशांत डिग्रसकर व संदीप सोनटक्के यांनी सांगितले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment