30 October, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भयमुक्त आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करा - निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव
• समाज माध्यमांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश-निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ.राकेशकुमार
हिंगोली (जिमाका), दि 30 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील सर्व यंत्रणा निवडणूक कामासाठी सज्ज झाली असून, हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील संपूर्ण यंत्रणेने चांगले नियोजन केले आहे. यापुढील काळातही निवडणूक भयमुक्त आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांनी आज येथे दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आज निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांच्या अध्यक्षतेखाली हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघाच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पोलीस निवडणूक निरीक्षक डॉ.राकेशकुमार बन्सल, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उप जिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुष मुथा यावेळी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी मतदारसंघाच्या निवडणूक तयारीचे सादरीकरण केले. याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह विभाग प्रमुखांनी सादरीकरण केले.
हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रांना भेटी देत तपासणी केल्याचे सांगून श्रीमती वंदना राव म्हणाल्या की, येथील मतदान केंद्रांवर मतदारांना मतदानाच्या दिवशी सर्व आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्यात. यामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृह, पुरेसा विद्युत पुरवठा, रॅम्प, दिव्यांगांसाठी व्हीलचेअर, त्यांना ने-आण करण्यासाठी वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देत प्रत्येक मतदान केंद्रावर मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी समाज माध्यमासह स्वीपच्या माध्यमातून जनजागृती करावी. तसेच मतदानाच्या दिवशी घरातील प्रत्येक मतदार मतदानासाठी केंद्रावर येईल, याकडे यंत्रणेने विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था परिस्थिती कठोरपणे हाताळा आणि कोणत्याही परिस्थितीत आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनाने निवडणूक काळात संवेदनशीलतेने समन्वय ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
विधानसभा मतदारसंघात नेमलेल्या पथक प्रमुखांनी आचारसंहिता भंगाच्या घटनावर विशेष लक्ष द्यावे. कमी मतदान होणाऱ्या मतदान केंद्रावर विशेष लक्ष देऊन मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी विशेष जनजागृती मोहिम राबवावी. जास्तीत जास्त मतदारांकडून मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवावी. मतदानासाठी आवश्यक असलेल्या 12 ओळखपत्रांबाबत विविध माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करावी. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ ग्रामीणमध्ये येत असल्यामुळे जास्त मेहनत घेऊन सर्व मतदार याद्या, मतचिठ्ठ्यांचे वाटप वेळेत पूर्ण करा. मतदारांचे नाव, मतदान केंद्र क्रमांकांबाबत माहिती द्यावी तसेच योग्य समन्वयातून निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडावी, अशा सूचनाही श्रीमती राव यांनी दिल्या.
पोलीस निवडणूक निरीक्षक डॉ.राकेशकुमार बन्सल यांनी यावेळी स्ट्रॉंग रूमच्या सुरक्षा व्यवस्थेपासून तपासणी पथकाच्या तत्परतेबाबत आढावा घेतला. सर्व वरिष्ठ अधिकारी निवडणुकीच्या काळात कार्यरत असून, सर्वांनी या काळात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी सर्व त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात व योग्य समन्वय राखत काम करावे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे प्रत्यक्ष क्षेत्रीय स्तरावर तितक्याच जोमाने आणि अचूकपणे कार्यरत राहावे. या निवडणूक प्रक्रियेत कोणावरही कार्यवाहीची वेळ येणार नाही यासाठी निवडणुकीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण द्यावेत. सर्वांनी चांगली तयारी केली असली तरी निवडणूक काळात निर्भय व निपक्षपणे निवडणुका होण्यासाठी काम करावे. सर्व पथक प्रमुख निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कार्यरत झाले असून, त्यांनी सक्रीय राहून आपले कर्तव्य पार पाडावेत. या कामात हयगय होणार नाही याची खबरदारी घ्यावी. निवडणूक काळात समाजमाध्यमांच्या माध्यमातून मतदारांमध्ये जनजागृती करणे तसेच उमेदवारांच्या समाज माध्यमांवरील पोस्ट, फोटो, व्हिडीओवर विशेष लक्ष ठेवावेत. तसेच समाज माध्यमांवर जाती-धर्मात, समाजा-समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश डॉ. राकेशकुमार बन्सल यांनी दिले.
यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी नियुक्त निवडणूक निर्णय कक्ष, स्वीप, प्रशिक्षण व व्यवस्थापन, आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, ईव्हीएम कक्ष, मतदान, मीडिया, माहिती व्यवस्थापन तक्रार निवारण कक्ष, सी-व्हीजील, वाहतूक व संपर्क व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, तसेच हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
या बैठकीस सर्व जिल्हास्तरीय पथक प्रमुख, सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व कार्यालय प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment