08 October, 2024

नवदुर्गा उत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर

हिंगोली (जिमाका), दि. 08 : नवदुर्गा उत्सवानिमित्त स्त्री शक्तीचा जागर करुन गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व लिंग निवडीस प्रतिबंधक अधिनियम 1994 कायद्याचे काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी येथील जिल्हा रुग्णालयातील प्रसव पश्चात कक्षामध्ये आज मंगळवार (दि.08)रोजी जन्मलेल्या प्रथम कन्यांचे स्वागत करण्यात आले. सर्व समाजातील जन्मलेल्या मुलींच्या आई-वडिलांचा शाल व श्रीफळ, साडी, मुलीला ड्रेस व मिठाई देऊन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, डॉ. बालाजी भाकरे, मेट्रन बालासाहेब चिंचकर व सहायक मेट्रन श्रीमती आशा क्षीरसागर यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तडस यांनी आजच्या दिवशी स्त्री जन्माचे महत्त्व पटवून दिले. तसेच कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तीची माहिती देणाऱ्या व्यक्तीस बातमीची खातरजमा करून व त्या अनुषंगाने खटला दाखल झाल्यास राज्य शासनामार्फत एक लाख रुपये बक्षीस देण्यात येईल. माहिती देणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. माहिती देण्यासाठी ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालय आणि जिल्हा शल्यचिकित्सक जिल्हा रुग्णालय, हिंगोली येथे संपर्क साधून टोल फ्री क्रमांक 18002334475 व 104 यावर तक्रार नोंद करावी, अशी माहिती देण्यात आली. या प्रसंगी डॉ. अशिष अंभोरे, सोनोग्राफी कक्षातील सुजाता कदम व प्रसूती कक्षातील सिंधु गांगुर्डे व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन अॅड. सुकेशिनी ढवळे यांनी केले. ******

No comments: