17 October, 2024

अत्यावश्यक सेवेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी टपाली मतपत्रिकेसाठी 12 डी नमुना भरुन जमा करावेत - अपर जिल्हाधिकारी श्री. परदेशी

हिंगोली (जिमाका), दि. 17 : अत्यावश्यक सेवेत कार्यरत अधिकारी-कर्मचारी यांनी टपाली मतपत्रिकेसाठी 12 डी नमुना भरुन संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत, असे निर्देश अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आयोजित बैठकीत दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी अत्यावश्यक सेवेतील मतदारांना टपाली मतपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस टपाली मतपत्रिकेचे पथक प्रमुख तथा उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. मंगेश टेहरे, पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोलीस उप अधीक्षक एस. डी. नाईक, नगर पालिका प्रशासनाचे सहायक आयुक्त अनंत जवादवार, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी जगदीश माने, सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक एस. एल. बोराडे, बीएसएनएलचे प्रकाश मेघवाल, महावितरणचे अ. अ. मोरे, सहायक वनसंरक्षक एस. आर. माने यांच्यासह विविध कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री. परदेशी म्हणाले, अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी यांची टपाली मतपत्रिकेसाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे 12 डी फॉर्मची मागणी नोंदवावी. सदरचे 12 डी नमुना प्राप्त करुन ते संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे जमा करावेत. मतदानाच्या दिवशी मतदान करता यावे, यासाठी रुग्णालयात कार्यरत डॉक्टर, परिचारिका आणि संबंधित कर्मचारी यांच्या दैनंदिन कामकाज करताना मतदान करण्यासाठी वेळेची सवलत देण्यात यावी. त्यामुळे त्यांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहणार नाहीत, याची प्रत्येक कार्यालय प्रमुखाने काळजी घ्यावी, असे निर्देशही अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिले आहेत. तसेच सेना दलातील जवानांना टपाली मतपत्रिका पाठविण्यासाठी पोस्टातर्फे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. ******

No comments: