09 October, 2024

हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ई-लोकार्पण

• हिंगोली जिल्हा आरोग्य क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न राहील- जिल्हाधिकारी हिंगोली (जिमाका), दि.09 : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग संचालनालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई अधिनस्त हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ई-लोकार्पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण व आयुष (स्वतंत्र पदभार) राज्यमंत्री प्रतापराव जाधव, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण व आयुषचे अध्यक्ष राजीव निवतकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे हे ऑनलाईन उपस्थित होते. तर हिंगोली येथून जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, माजी आमदार गजानन घुगे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी हिंगोली येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक गोष्टींचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे विकास होणार आहे. तसेच जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सुविधा निर्माण होणार आहे. या वैद्यकीय महाविद्यालयाच्या निर्मितीसाठी संघर्ष केलेल्या समितीचे, आजी माजी लोकप्रतिनिधी, पत्रकार तसेच हिंगोलींकराचे अभिनंदन केले. या वैद्यकीय महाविद्यालयामुळे उपचारासाठी एकही रुग्ण बाहेर गावी पाठविण्याची गरज भासू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. तसेच हिंगोली जिल्हा आरोग्य क्षेत्रात अग्रेसर राहण्यासाठी प्रयत्न राहील, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. हिंगोली येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या लोकार्पणाचे ई-प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व धन्वंतरी मूर्तीला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चक्रधर मुंगल यांनी हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात यावर्षीपासून होत आहे. यावर्षी 100 विद्यार्थ्यांना या महाविद्यालयातून प्रवेश मिळणार आहे. याबाबतची प्रवेश प्रक्रिया सुरु आहे. या महाविद्यालयासाठी वळू माता प्रक्षेत्राची 15.29 आर जमीन उपलब्ध झाली आहे. या जागेमध्ये 100 विद्यार्थी क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय व संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय, वसतीगृह व निवासस्थान इत्यांदीचे बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारत बांधकामासाठी मेकॉन लि. दिल्ली या कंपनीसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हे बांधकाम पूर्ण होण्यासाठी अंदाजे 5 वर्षे लागणार असल्यामुळे नवनिर्मित वैद्यकीय महाविद्यालयासाठी मौजे बळसोंड व सावा मधील खाजगी इमारत भाडे तत्वावर घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच या वैद्यकीय महाविद्यालयासाठी 986 पदांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यानुसार पदभरती करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या कार्यक्रमास विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****

No comments: