08 October, 2024

मच्छीमारांनी मत्स्य उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात - कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक व प्रमुख डॉ. प्रमोद शेळके

हिंगोली (जिमाका), दि.08 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मत्स्य शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात पुढाकार घ्यावा. जिल्ह्यातील मत्स्य व्यावसायिकांना असलेल्या समस्या निवारणासाठी या कंपन्या मार्गदर्शक ठरतील. शासनाच्या विविध योजनांचा फायदा उत्पादक कंपनी स्थापन करुन घेता येईल. मच्छीमार बांधवांनी कोल्ड स्टोरेज, मत्स्य विपणन, माशांची बाजारपेठेतील उपलब्धता या बाबीकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मत्स्य संस्थांमध्ये महिलांचे प्रमाण अत्यल्प असून महिलांनी एकत्र येऊन मत्स्य उत्पादक कंपन्या स्थापन कराव्यात, असे आवाहन कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक व प्रमुख डॉ. प्रमोद शेळके यांनी यावेळी केले. भारत सरकारच्या सहकार मंत्रालय आणि मत्स्य व्यवसाय विभाग, लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकॅडमी फॉर को-ऑरेटिव्ह रिसर्च अँण्ड डेव्हलपमेंट प्रशिक्षण केंद्र, एन. सी. डी. सी. पुणे तसेच कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील जिल्हा परिषदेच्या सभागृहात पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत मच्छीमारासाठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रवण व्यवहारे, पुणे येथील राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे उपनिदेशक गणेश गायकवाड, तसेच जिल्ह्यातील मच्छिमार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय सहकारी विकास निगमचे उपनिदेशक गणेश गायकवाड यांनी कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाच्या विविध योजनांची तपशीलावर माहिती दिली. मत्स्य शेतकरी उत्पादक संस्थांसाठी असलेल्या विविध योजनांसाठी प्रस्ताव कसे तयार करायचे, याबाबत ठाणे जिल्हा मत्स्य व्यवसाय सहकारी संघाच्या ऋतुपर्णा काजळे यांनी प्रशिक्षणाला मार्गदर्शन केले. मच्छीमार बांधवांसाठी झालेल्या सादरीकरणांमध्ये सहाय्यक आयुक्त श्रवण व्यवहारे यांनी किसान क्रेडिट कार्ड, अपघात गटविमा तसेच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. यंग प्रोफेशनल अमोल भडके यांनी आभार व्यक्त केले. या एक दिवशीय कार्यशाळेला मच्छीमार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ******

No comments: