17 October, 2024
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 मुद्रणालयधारकांनी प्रसार साहित्य मुद्रित करताना योग्य ती खबरदारी घ्यावी - जिल्हाधिकारी अभिनव गोयल
हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 चे कलम 127 अ अन्वये निवडणूक पत्रकाच्या व भिंतीपत्रकाच्या छपाईबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार ही छपाई कामे करण्यासाठी मुद्रणालयधारकांनी (प्रिंटींग प्रेसधारकांनी) छपाई करताना आदर्श आचारसंहितेचे पालन होईल तसेच कोणत्याही प्रकारे याचे उल्लंघन होणार नाही, याची योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे दिल्या.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी आज नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित मुद्रकांच्या बैठकीत सूचना दिल्या. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड आदी यावेळी उपस्थित होते.
उमेदवार किंवा त्यांचे प्रतिनिधी अथवा राजकीय पक्ष यांच्याकरिता छपाई करुन देताना मुद्रीत मजकुराची माध्यम प्रमाणन व सनियंत्रण समितीकडून प्रमाणित करून घेतल्याची खात्री करावी. त्याशिवाय मुद्रीत मजकुराची छपाई करताना त्यावर प्रकाशकाचे नाव व संख्या, संपर्क क्रमांक सुस्पष्ट स्वरुपात नमूद करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिले. याचे उल्लंघन झाल्यास संबंधित मुद्रणालयधारकाविरुद्ध लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 मधील तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी हिंद प्रिंटींग प्रेस, विकास प्रिंटर्स, सुरभी ऑफसेट, महालक्ष्मी ऑफसेट आदी मुद्रणालयाच्या प्रतिनिधींची उपस्थिती होती.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment