22 October, 2024

निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान घेणार यंत्रणेचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 22 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा सज्ज झाली असून, आजपासून नामनिर्देशन पत्रांची विक्री व स्विकृतीची प्रक्रियाही सुरू झाली आहे. गुजरात केडरचे असलेले निवडणूक खर्च निरीक्षक अर्जुन प्रधान हे उद्या बुधवारी (दि. 23) सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृहात यंत्रणेचा आढावा घेणार असून, सर्व पथक प्रमुखांनी या बैठकीला अद्ययावत माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी संबंधितांना दिले आहेत. सर्व जिल्हा नोडल अधिकारी, आयकर अधिकारी, एल. आय. सी. अधिकारी, वस्तु व सेवा कर अधिकारी, सर्व सहाय्यक खर्च निरीक्षक, एफएसटी, एसएसटी पथक प्रमुख यांनी अद्ययावत माहितीसह उपस्थित राहण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी दिल्या आहेत. भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याअनुषंगाने निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली खर्च विषयक कामकाजाच्या अनुषंगाने ही आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या आढावा बैठकीमध्ये निवडणूक निरीक्षक (खर्च) श्री. प्रधान यांच्याकडून निवडणूक खर्चविषयक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. ******

No comments: