07 October, 2024

बालकाशी निगडीत विविध विषयावर दसरा महोत्सवात जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 07 : जिल्ह्यात दसरा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन 1098 कक्षाकडून बालकाशी निगडीत विविध विषयावर दसरा महोत्सवात जनजागृती कार्यक्रम घेण्यात येत आहेत. या जनजागृती कार्यक्रमात बालविवाह, बाल भिक्षेकरी, रस्त्यावर फिरणारी बालके, हरवलेली बालके, विनापालक मिळून आलेल्या बालकांचे समुपदेशन, मार्गदर्शन, बालकामगार, बालकांचे पुनर्वसन करणे, व्यसनाधीन बालके, काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांप्रती येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले. चाईल्ड हेल्पलाईन 1098 हा टोल फ्री क्रमांक बालकांसाठी तात्काळ मदत करणारी हेल्पलाईन आहे. या टोल फ्री क्रमांकावर माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते. त्यानुसार जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड हेल्पलाईन 1098 कडून जिल्हाभरात बालकासंदर्भात जनजागृती सुरु असल्याची माहितीही श्रीमती कोरडे यांनी दिली. या कार्यक्रमास सहायक पोलीस निरीक्षक गंधकवाड, चाईल्ड हेल्पलाईनचे समुपदेशक अंकुर पाटोडे, पर्यवेक्षक विकास लोणकर, श्रीकांत वाघमारे, केस वर्कर राजरत्न पाईकराव, सूरज इंगळे, पोलीस कर्मचारी संजय डोंगरदिवे व इतर पोलीस कर्मचारी, नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. ******

No comments: