26 October, 2024
बासंबा व परिसरातील शेतकऱ्यांना कापूस व हळद पिकांच्या कीड रोगाबाबत मार्गदर्शन
हिंगोली (जिमाका), दि. 26: येथील तालुका कृषि अधिकारी कार्यालयाच्या वतीने हिंगोली तालुक्यातील बासंबा व परिसरातील गावात कापूस व हळद पिकांची पाहणी करुन कीड व रोग या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे किटक शास्त्रज्ञ (पिक संरक्षण) अजयकुमार सुगावे यांनी पीक परिस्थितीची पाहणी केली. यावेळी सद्य परिस्थितीत हळद पिकाच्या पानावरील ठिपके (करपा) रोगाची लक्षणे दिसताच बुरशीनाशकाची फवारणीसाठी मॅन्कोझेब (75 डब्ल्यूपी) 2 ते अडीच ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (50 डब्ल्यूपी) 1 ते 2 ग्रॅम किंवा प्रोपीकॉनॅझॉल (25 ईसी) 1 मिली प्रती लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करुन व्यवस्थापन करण्याची शिफारस करण्यात आली.
खोड किडीबाबत पानावर एका ओळी रांगेत छिद्रे पडलेली दिसतात. त्या संदर्भात हळद पिकाबाबत आधीच शिफारशीत किटकनाशकाची फवारणी शेतकऱ्यांनी केली असल्याचे आढळून आले. नव्याने लक्षणे आढळून आल्यास नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस (25 टक्के) 20 मि.ली. प्रती 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी, असे मार्गदर्शन केले.
कपाशीबाबत पिकात पानावरील ठिपके या रोगासाठी कार्बेन्डाझिम 3.3 ग्रॅम किंवा अक्झोक्सीस्रॉरणबीन+डायफेनोकोनॅझोल या संयुक्त बुरशीनाशकाची 10 मिली प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. तसेच लाल्या या विक्रृतीसाठी शिफारशीत अन्नद्रव्य मॅग्नेशियम सल्फेट यांची फवारणी सांगितली. तसेच गुलाबी बोंडअळीसाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन संदर्भात संपूर्ण माहिती दिली तसेच यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी तालुका कृषि अधिकारी शिवसंदीप रणखांब, मंडळ कृषि अधिकारी कमलाकर सांगळे, कृषि पर्यवेक्षक गणेश पवार, राजीव हुलेकर, कृषि सहायक रेखा पिंपरे, छाया ठोंबरे, पुजा मकासरे व गावातील सर्व शेतकरी वर्ग उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment