17 October, 2024

हिंगोली जिल्ह्यात ध्वनिक्षेपक वापरावर निर्बंध लागू

हिंगोली (जिमाका), दि. 17 : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या आदर्श आचारसंहिता कालावधीत निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांच्या वाहनावरील ध्वनीक्षेपकामुळे ध्वनीप्रदूषण होते. परिणामी सामान्य नागरिकांच्या जीवनातील शांतता व स्वास्थ्यास बाधा पोहोचण्याची शक्यता असते. त्यामुळे भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 नुसार निवडणूक आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. या नियमानुसार निवडणूक काळात जिल्ह्यात ध्वनीक्षेपक वापरावर निर्बंध घालण्यात आले असून, त्याविषयीचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी अभिनव गोयल यांनी निर्गमित केला आहे. भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निवडणुका विना अडथळा व शांततेत पार पडण्यासाठी निवडणुकीच्या काळात ध्वनीक्षेपक वापरावर आयोगाने प्रतिबंध आणले आहेत. कोणतीही व्यक्ती, संस्था, पक्ष कार्यकर्ते यांना ध्वनीक्षेपकाचा (लाऊडस्पिकरचा वापर) सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही. फिरते वाहन रस्त्यावरुन धावत असताना त्यावरील ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही. निवडणूक कालावधीत ध्वनीक्षेपकाचा वापर सकाळी 6 ते रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दि. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत अंमलात राहतील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. गोयल यांनी निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे. *******

No comments: