24 October, 2024

जिल्ह्यात 14 केंद्रांवर होणार शिक्षक पात्रता परीक्षा • जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी घेतला आढावा

हिंगोली, दि. 24(जिमाका) : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेमार्फत दि. 10 नोव्हेंबर 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यात शिक्षक पात्रता परीक्षा ही 14 केंद्रावर दोन सत्रात होणार असून, 4 हजार 831 उमेदवार परीक्षा देणार आहेत. या परीक्षेच्या यशस्वी आयोजनाबाबत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी संबंधितांना सूचना दिल्या. या बैठकीस जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य दीपक साबळे, शिक्षणाधिकारी (मा) प्रशांत डिग्रसकर, शिक्षणाधिकारी (प्रा) संदीपकुमार सोनटक्के, जिल्हा परीरक्षक नितीन नेटके, सहायक जिल्हा परीरक्षक सुरेश सोनुने हे उपस्थित होते. ही परीक्षा सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रात आयोजित केली आहे. सकाळी 1865 विद्यार्थी असून, त्यांची परीक्षेची वेळ रविवार सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत आहे. दुपारच्या सत्रात 2 हजार 966 विद्यार्थी परीक्षा देणार असून, त्यांची वेळ दुपारी 2 ते 4.30 पर्यंत राहील. या होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संकीर्ण-2013 दि. 14 नोव्हेंबर 2023 नुसार जिल्हास्तरीय आयोजन व संनियत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. गोयल यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडली. विद्यार्थ्यांसाठी त्यांचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्ध केले असून, परीक्षेवेळी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्राशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच विद्यार्थ्यांनी पुरावा म्हणून मूळ ओळखपत्र, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक ओळखीचा पुरावा सोबत बाळगणे अनिवार्य आहे. तसेच दोन पेपरसाठी स्वतंत्र प्रवेशपत्र असणे आवश्यक आहे. दोन पेपरसाठी बैठक क्रमांक वेगळा असणार आहे. त्यामुळे स्वतंत्र प्रवेशपत्र आवश्यक आहे. त्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी परीक्षा केंद्राची खात्री करून घेण्याच्या सुचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या आहेत. परीक्षा सुरू होण्यापूर्वी परीक्षार्थींना परीक्षा गृहात 20 मिनिटे आधी प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत परीक्षार्थीस परीक्षागृहात प्रवेश असणार नाही. विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रात मोबाईल किंवा इतर कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट आणण्यास निर्बंध केला आहे. विद्यार्थ्यांनी प्रवेश पत्राच्या मागे दिलेल्या सूचनाचे वाचन करावे. या बैठकीत जिल्हाधिकारी यांनी 4 भरारी पथकाची नियुक्ती करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. तसेच शिक्षणाधिकारी (योजना) व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांची 2 पथके असणार आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024 सुरळीत पार पाडावी, यासाठी परीक्षा परिषदेमार्फत प्रत्येक परीक्षा दालनात, केंद्राच्या प्रवेशव्दारावर केंद्र नियंत्रण कक्षात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. उमेदवाराची तपासणी करिता फिंगरप्रिंट व फेस स्कॅनिंग, फ्रिस्किंग इ. सुविधा प्रत्येक केंद्रात देण्यात येणार आहेत. तसेच सदर परीक्षेसाठी पुरेशा प्रमाणावर पोलीस बंदोबस्त पुरविण्यात येणार असून, परीक्षा केंद्राच्या बाहेर 100 मीटरच्या आत कोणतेही झेरॉक्स मशीन चालू राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिल्या आहेत. *****

No comments: