17 October, 2024

भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचे पालन करावे - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

• राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक हिंगोली (जिमाका), दि. 17 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आदर्श आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाकडून देण्यात आलेल्या दिशानिर्देशांचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेमार्फत विविध पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये स्थिर निगराणी पथके, भरारी पथकांचा समावेश आहे. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचे अवैध प्रकार होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. सर्व राजकीय पक्ष, निवडणूक लढविणारे उमेदवार यांनी भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशानुसारच काम करणे बंधनकारक आहे. प्रचारासाठी आवश्यक बाबींची पूर्वपरवानगी घेऊनच प्रचार सभा, वाहने याद्वारे प्रचार केला जावा, असे जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले. *****

No comments: