22 October, 2024

वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांच्याकडून विविध पथकांचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 22 : वसमत विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी आज विविध पथक प्रमुखांची 92-वसमत विधानसभा निवडणूक पूर्वतयारीबाबत आढावा बैठक घेत विविध सूचना दिल्या. सर्वप्रथम निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेले व्हीएसटी आणि व्हीव्हीटी व व्हिडीओग्राफरची विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बैठक घेण्यात आली. या बैठकीला पथकातील अधिकारी व कर्मचारी तसेच व्हिडीओग्राफर हे उपस्थित होते. व्हीव्हीटी पथकाने नेमून दिलेल्या कार्यक्षेत्रात प्रत्यक दिवशी सभा, रॅली, इत्यादी बाबतचे चित्रीकरण करण्यात आलेल्या व्हीडीओची पाहणी करावी. व्हीएसटी पथकातील नोडल अधिकारी यांनी राजकीय पक्षाची सभा असलेल्या ठिकाणी वापरलेल्या साहित्याचे चित्रीकरण करताना नोडल अधिकाऱ्यांनी मंडप, खुर्ची, सतरंजी, स्टेज, लाउडस्पीकर याबाबत सविस्तर माहिती देण्याचे निवडणूक निर्णय अधिकारी श्री. माने यांनी सांगितले. आजपासून उमेदवारी अर्ज भरणे सुरू झाले असून, या सर्व प्रक्रियेचे छायाचित्रण करावे. सोबतच सर्वांनी निवडणूक विभागाकडून आपले ओळखपत्र तयार करून स्वत:कडे ठेवण्याच्या सूचना दिल्या. उमेदवाराने उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती या पथकास देण्यात येईल. त्याप्रमाणे त्यांनी संबंधित उमेदवार एखादी प्रचार सभा किवा कॉर्नर सभा घेत असल्यास त्यांनी त्यासाठी अधिकृत परवानगी घेतल्याबाबत चौकशी अहवाल पथकप्रमुखांकडे सादर करण्याचे निर्देश दिले. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील सर्व छायाचित्रण करावे. मतदान केंद्रांच्या 100 मीटर परिसरातील नियमांचे उल्लंघन केल्यास तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आल्यास त्याचे चित्रीकरण करावे तसेच मतदान यंत्र सील करतेवेळी चित्रिकरण करावे. खर्च नियंत्रण कक्षाने उमेदवाराने केलेल्या खर्चाच्या बाबी तपासून केलेल्या खर्चाची तपासणी करावी. तसेच संबंधित उमेदवारास योग्य सूचना देण्याबाबत त्यांनी सांगितले. *****

No comments: