17 October, 2024

नामनिर्देशनपत्र दाखल करताना उमेदवाराने नियमांचे पालन करावे - जिल्हा दंडाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि.17 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून, दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. तसेच सर्व संबंधितांना नोटीस देऊन त्यांचे म्हणणे ऐकूण घेणे सद्य परिस्थितीत शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढणे आवश्यक आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस ताफ्यामध्ये तीन मोटारगाड्या, वाहने यांचा समावेश असावा. तसेच नामनिर्देशन दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात पाच व्यक्ती उपस्थित राहतील. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात, तसेच दालनात या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणणे आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास जिल्हा दंडाधिकारी अभिनव गोयल यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रतिबंध करण्याचे आदेश दिले आहेत. हे आदेश दि. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत लागू राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. *******

No comments: