23 October, 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणूक निरीक्षक (खर्च) यांच्याकडून पथक प्रमुखांचा आढावा, निवडणुका पारदर्शक, निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी बारकाईने लक्ष ठेवावे - निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान

हिंगोली (जिमाका),दि.23 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ची आदर्श आचार संहिता मतदारसंघात लागू झाली असून, नामनिर्देशन पत्रेही उमेदवारांकडून दाखल केली जात आहेत. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूकविषयक सर्व बाबींवर बारकाईने लक्ष ठेवून कामकाज करावे, अशा सूचना निवडणूक निरीक्षक (खर्च) अर्जुन प्रधान यांनी पथक प्रमुखांच्या आयोजित आढावा बैठकीत दिल्या. हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजित बैठकीत निवडणूक खर्च निरीक्षक अर्जुन प्रधान यांनी सर्व पथक प्रमुखांचा आढावा घेतला. निवडणूक कालावधीमध्ये तक्रार असल्यास निरीक्षक अर्जुन प्रधान यांच्याशी (9900845990) व त्यांचे संपर्क अधिकारी शशीकिरण उबाळे (9763726995) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे व्यासपीठावर उपस्थित होते. राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर संनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समितीच्या पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक ठेवाव्यात. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी. अभिरुप नोंदवहीतील नोंदी अद्यावत ठेवाव्यात. तसेच एसएसटी आणि एफएसटी या पथकांनी आपली जबाबदारी दक्षतेने पार पाडावी. निवडणूक कालावधीमध्ये तपासणी नाक्यांवर तपासणी करताना कोणतीही दिरंगाई करू नये, कर्तव्यावर असलेल्या पथक प्रमुख आणि पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केल्यास योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे निर्देश अर्जुन प्रधान यांनी यावेळी सांगितले. विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी त्याच दिवशी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवाव्यात. यामध्ये अजिबात दिरंगाई होणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच उमेदवारांचे निवडणुकीशी संबंधित स्वतंत्र बँक खाते असणे आवश्यक आहे. उमेदवारांच्या बँक खात्यातून दैनंदिन काढण्यात येणाऱ्या रकमेवर तसेच युपीआयद्वारे वितरीत करण्यात येणाऱ्या रकमेवर बारकाईने लक्ष ठेवावेत. निवडणुकीत गैरव्यवहार प्रकरणी नागरिकांकडून तक्रार प्राप्त होताच त्याचे तात्काळ निवारण करून निकाली काढावेत. तसेच सर्व पथक प्रमुखांनी समन्वयाने काम करावेत. इतर विभागाशी संबंधित माहिती मिळाल्यास ती माहिती संबंधित विभागास कळवावी. जेणेकरुन त्याच्यावर कारवाई करणे सोयीचे होईल. तसेच मतदार संघात मद्य वाटप होणार नाही यावर लक्ष ठेवावे, अशा सूचना श्री. प्रधान यांनी दिल्या. बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या तयारीची सविस्तर माहिती सादरीकरणाद्वारे दिली. कायदा व सुव्यवस्थेच्या अनुषंगाने केलेल्या तयारीची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी दिली. तसेच यावेळी आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीची माहिती पथक प्रमुख नामदेव केंद्रे, खर्च नियंत्रण समितीचे पथक प्रमुख दिगंबर माडे, ईएसएमएसबाबत उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, जिल्हा ॲग्रणी बँकेचे व्यवस्थापक पंकज बोरकर, जिल्हा माध्यम व प्रमाणन समितीचे पथक प्रमुख प्रभाकर बारहाते, आयकर अधिकारी जी. बी. आठवले, वस्तू व सेवा कर कार्यालयाचे सहायक आयुक्त दीपक खंदारे तसेच संबंधित विधानसभा मतदार संघाचे सहायक निवडणूक खर्च निरीक्षक शोभा मुंडे (वसमत), नामदेव राठोड (कळमनुरी) व राम दंडे (हिंगोली) यांनी विधानसभा निवडणुकीशी संबंधित कामकाजाच्या तयारीबाबतची माहिती दिली. जिल्हा तिन्ही विधानसभा मतदारसंघाचे खर्च समितीचे प्रमुख यांच्यासह विविध कामकाज करण्यासाठी नेमण्यात आलेले पथक प्रमुख, व्हीएसटी, व्हीव्हीटी, एसएसटी, लेखांकन करणारा पथक, भरारी आदी पथकाचे वसमत, कळमनुरी, हिंगोली विधानसभा मतदार संघातील प्रमुख यांची उपस्थिती होती. *****

No comments: