19 October, 2024

हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

हिंगोली (जिमाका), दि. 19 : विधानसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाना वितरीत करावयाच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट या मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळीकरणाची (फर्स्ट रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधीसमोर आज पूर्ण करण्यात आली. यातून कोणते ईव्हीएम मशीन कोणत्या मतदारसंघात जाणार, हे निश्चित करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ईव्हीएम सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी मंजुषा मुथा, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी तसेच विविध राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये सर्व प्रकारच्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट्सची नोंद घेऊन मतदारसंघनिहाय वितरित करण्यात येते. जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या संख्येपेक्षा बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट यंत्रे हे 20 व 30 टक्के अधिक प्रमाणात संबंधित मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरित करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदारसंघासाठी 392 बॅलेट युनिट, 392 कंट्रोल युनिट व 425 व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. 93-कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी 414 बॅलेट युनिट, 414 कंट्रोल युनिट व 448 व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी 411 बॅलेट युनिट, 411 कंट्रोल युनिट व 445 व्हीव्हीपॅट यंत्र उपलब्ध करण्यात आले आहेत. निवडणूक मतदान यंत्र वितरीत करताना 20 टक्के कंट्रोल युनिट व 30 टक्के व्हीव्हीपॅट मशीन अतिरिक्त देण्यात आल्या आहेत. यानंतर संबंधीत विधानसभा मतदार क्षेत्रात कोणत्या मतदान केंद्रावर कोणते मतदान यंत्र जाईल, हे निश्चित करण्यासाठी पुन्हा एकदा मतदान यंत्रांच्या सरमिसळीची प्रक्रिया संबंधित विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर पार पाडेल, अशी माहिती यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना दिली. मनुष्यबळाचीही सरमिसळ प्रक्रिया पूर्ण निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना देण्यात येणार 26 व 27 ऑक्टोबर रोजी प्रशिक्षण जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज राष्ट्रीय सूचना व विज्ञान केंद्रामध्ये मनुष्यबळाचीही सरमिसळ प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पार पडली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिद्दीकी उपस्थित होते. जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदारसंघासाठी 1616, 93-कळमनुरी विधानसभा मतदारसंघासाठी 1783 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी 2059 असे एकूण 5458 मनुष्यबळाची सरमिसळ प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. निवडणुकीसाठी मनुष्यबळ वितरीत करताना 20 टक्के मनुष्यबळ अतिरिक्त देण्यात आले आहे. निवडणुकीसाठी नियुक्त सर्व कर्मचाऱ्यांना पहिले प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना सुरमनी दत्ता चौगुले नाट्यगृह, वसमत येथे दि. 26 व 27 ऑक्टोबर, 2024 रोजी दोन सत्रामध्ये प्रशिक्षण देण्यात येणार आहेत. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतीगृह, कळमनुरी येथे दि. 26 व 27 ऑक्टोबर, 2024 रोजी दोन सत्रात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना हिंगोली येथील आदर्श महाविद्यालयात दि. 26 ऑक्टोबर, 2024 रोजी दोन सत्रात प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. ******

No comments: