17 October, 2024

प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावणे इत्यादी बाबीसाठी निर्बंध

हिंगोली (जिमाका), दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक 2024 साठी कार्यक्रम घोषित केला असून दि. 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे, इत्यादी बाबींसाठी बंधन घालणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हादंडाधिकारी अभिनव गोयल यांनी भारतीय नागरी सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये पुढीलप्रमाणे आदेशाद्वारे निर्बंध घातले आहेत. यामध्ये फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजूला विंड स्क्रिन ग्लासच्या पुढे राहणार नाही. तसेच तो त्या वाहनाच्या टपापासुन 2 फूट उंचीपेक्षा जास्त राहणार नाही. प्रचाराच्या फिरत्या वाहनांवर कापडी फलक वाहन चालकाच्या आसनामागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजूने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजूस तो लावता येणार नाही. फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश दि. 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत लागू राहणार आहेत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. ***

No comments: